हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका, रिऍलिटी शो आणि आता चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे किरण माने लोकप्रिय तर आहेतच. शिवाय गेल्या काही दिवसांपासून वारंवार चर्चेतही आहेत. सुरुवातील सोशल मीडियावर वादग्रस्त लिखाण करणारे किरण माने बिग बॉसमधून मूळ रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि त्यांच्या मनात वसले. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग दिवसागणिक वाढला. अशातच आज त्यांनी एक खास पोस्ट शेअर करत त्यांच्या आयुष्यातील एका अविस्मरणीय अनुभवातून तयार झालेल्या कलाकृतीविषयी आणि त्या कलाकृतीमागील प्रेरणेविषयी लिहिले आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या कलाकृतीला समीक्षकांकडून मिळालेली दाद विशेष लक्षवेधी आहे.
किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय कि, ‘किरण्या, तिकीट का काढलंस? लै श्रीमंत झालास का? असं म्हणत किशोर कदमनं माझ्या खिशात शंभर रूपये कोंबले… सत्तावीस वर्षांपूर्वी, ‘स्ट्रगल’च्या त्याकाळात, शंभर रूपये खूप मोठ्ठे होते माझ्यासाठी.. मला नाटकाची नाईट ऐंशी रूपये मिळत होती! तरीही पृथ्वी थिएटरवर जाऊन एक हिंदी दीर्घांक पहाण्यासाठी मी तिकीट काढलंवतं… प्रयोग सुरू झाला.. आणि त्या अभिनेत्याचा भन्नाट परफाॅर्मन्स पाहून अक्षरश: खुर्चीला खिळून गेलो… तासाभराच्या त्या अद्भूत अभिनयाच्या आविष्कारानं मना- मेंदूवर कब्जा केला… त्या दीर्घांकाचं नांव होतं ‘पियानो बिकाऊ है’ आणि तो अभिनेता होता सौरभ शुक्ला!’
‘…नंतर माझा मित्र प्रसाद वनारसे यानं त्याच दीर्घांकाचं मराठीकरण केलं-‘हॅलो’. अस्सल मराठमोळं वाटावं इतकं भन्नाट लिहीलंवतं त्यानं. ते स्क्रीप्ट मी घरी एकटाच वाचत बसायचो. घरातल्या घरात परफाॅर्मन्सही सुरू केले.. त्यानंतर हळूहळू या गोष्टीला पंधरा सोळा वर्ष उलटून गेली.तोपर्यन्त इकडे यथावकाश माझी व्यावसायिक नाटकातल्या करीयरची गाडी रूळावर आली होती. एक दिवस गडकरी रंगायतनमधल्या व्हिआयपी रूममध्ये लताबाईंना मी ‘हॅलो’चा परफाॅर्मन्स करुन दाखवला. त्यांना लैच आवडला. म्हणाल्या, यावर तू दोन अंकी नाटक लिही. मी प्रोड्यूस करते. सातारला माझा दोस्त झाकीरच्या घरी राजीव मुळ्ये आणि मी, दोघांनी अनेक चर्चा करुन पंधरा दिवसांत दोन अंकी नाटक लिहीले. बघता- बघता ‘श्री चिंतामणी’तर्फे हे नाटक रंगभुमीवर आलंही.. नाटकाचं नांव होतं ‘ती गेली तेव्हा’!’
‘अभिनेता म्हणून हे लै लै लैच मोठ्ठं चॅलेंज होतं.. सव्वादोन तास पूर्णवेळ मी स्टेजवर- आठ वेगवेगळ्या भूमिका.. वेगळी बेअरिंग्ज, भिन्न आवाज.. एकही ‘ब्लॅकआऊट’ नाही.. सगळा कस पणाला लावणारं नाटक. मध्येमध्ये चार- पाच पात्रंही पेरली होती. नाटक थोडं आडवळणाचं असल्यामुळं मीच दिग्दर्शन करायचं ठरवलं. हिराॅईन योगिनी चौक होती. रोहीत चव्हाण, अजिंक्य ननावरे या सातार्यातल्या माझ्या ग्रुपमधल्या कलाकारांनाही मी संधी दिली. या नाटकानं अभिनेता म्हणून माझा आत्मविश्वास एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला! लोकसत्ताचे रविंद्र पाथरे यांनी अर्धा पान भरून लिहीलं. किरण माने यांची आवाजावरची हुकुमत अलिकडच्या काळात कुठल्याच अभिनेत्यात नाही असंही लिहीलं. तर म.टा.च्या जयंत पवार यांनी ‘एक भक्कम नट’ अशी भलीमोठी हेडलाईन दिली! ठाण्याच्या मधुकर मुळुकांनी लिहीलं, ‘मराठी रंगभुमीला काशीनाथ घाणेकर मिळाले’. आज मागं वळून पहाताना जाणवतं.. एका अफलातून अभिनेत्याच्या परफाॅर्मन्सपासून मिळालेली प्रेरणा आपल्याला कुठून कुठपर्यन्त घेऊन जाते ! लब्यू सौरभजी’.
Discussion about this post