हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तुकोबांचा वारसा जपणारा आणि विठूरायाची भक्ती करणारा मराठी अभिनेता किरण माने हे नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. कधी परखड बोलण्यासाठी तर कधी स्पष्ट मत मांडल्यामुळे ते अडचणीत आल्याचे बऱ्याचवेळा दिसून आले. पण प्रत्येक वेळी तुका म्हणे.., असे लिहीत त्यांनी आपली भूमिका आपल्याच शैलीतून व्यक्त केली आहे मग काहीही होउदे! किरण माने अनेकदा सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतात. त्यांच्या लेखणीला एक अनोखी धार आहे जी त्यांची पोस्ट चर्चेत आणते. याहीवेळी त्यांनी अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. एका शूटिंगसाठी माने पंढरीत पोहोचले आणि त्यानंतर शब्दातून व्यक्त झाले. त्यांनी विठुरायाचे दर्शन घेतलेच पण सोबत आजोबांच्या आठवणीने भावुकही झाल्याचे त्यांनी यात सांगितले आहे.
किरण माने यांनी लिहिलं कि, शुटिंगच्या निमित्तानं लै ठिकानी फिरलोय आजपर्यन्त… पन आयुष्यात पयल्यांदा अशा ठिकानी शुटिंग केलं जिथं माझ्या इठूरायाचा वास हाय… जिथं गेल्यावर माझा तुकोबा ‘पुन्हा जन्मा नाही आला’ अशा अवस्थेला पोचला होता…
पंढरी पंढरी । विठूरायाची नगरी ।।
भोंवता भिंवरेचा वेढा । मध्यें पंढरीचा हुडा ।।
गस्त फिरे चहूं कोनीं । टाळ मृदंगांची ध्वनी ।।
ऐसे स्थळ नाहीं कोठें । तुकयाला विठ्ठल भेटे ।।
…अशा माझ्या इठूरायाच्या नगरीत ‘शेमारू मराठीबाणा’च्या आषाढी एकादशी विशेष कार्यक्रमाचं शूटिंग झालं. कॅमेर्यापुढं उभं राहून वारकरी संप्रदायाची, वारीची, संतांची माहिती सांगताना भान हरपून गेलं ! चंद्रभागेच्या वाळवंटात पाऊल ठेवल्या-ठेवल्या, याच जागेवर जातीपातीच्या भिंती तोडून चोखा महार,जनाबाई,नरहरी सोनार, गोरा कुंभार, सावता माळी, पंजाबातून आलेला जाल्हण सुतार अशा अठरा पगड जातीच्या संतांचा मेळा भरवून वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवणारे नामदेव महाराज डोळ्यांपुढे दिसले.
गोपाळपुरा, विष्णूपद मंदिर, भुलेश्वर, पद्मावती… जाईन तिथं, ‘माझ्या तुकोबारायाची पावलं याच मातीत पडली असतील, याच भवतालात त्यानं श्वास घेतला असेल’ या विचारानं हरखून गेलो ! जाईन तिथं ‘किरण माने,किरण माने’ ओरडत फॅन्सची गर्दी धावत येत होती… कॅमेरामन, डायरेक्टर, इ.पी. वगैरे मंडळींना गर्दीला कंट्रोल करताना नाकी नऊ येत होते… शुटिंग संपल्यावर साक्षात पांडूरंगाच्या चरणावर मस्तक ठेवून आलो. चोखोबाच्या समाधीपुढे नतमस्तक झालो. संत नामदेवांचं जन्मस्थान पाहिलं. त्यांचे १६ वे वंशज ह.भ.प. माधवमहाराज नामदास यांच्या घरी पाहूणचार घेतला… “पंढरीसी नाहीं कोणा अभिमान । पायां पडे जन एकमेका ।।” या ओळी साक्षात अनुभवताना माझ्या आज्ज्याची आठवण आली आणि मन भरून आलं…- किरण माने.
Discussion about this post