हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते किरण माने सध्या गाव काय आणि शहर काय.. सगळीकडेच चर्चेत आहेत. बिग बॉस मराठी सीजन ४ नंतर किरण मानेंची हवा जोरदार आहे. किरण माने यांचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे त्यांनी एखादी पोस्ट शेअर केली आणि ती व्हायरल होऊन चर्चेत आली नाही तर नवल! अशीच एक पोस्ट शेअर करताना किरण मानेंनी एक मस्त कविता शेअर केली आहे. पण यावेळी हि नुसतं कविता नाही तर एक शिकवण आहे असे म्हणता येईल. किरण माने यांनी आपल्या या पोस्टमध्ये ‘सस्टेनेबल अर्बन फार्मिंग’बद्दल माहिती देऊ केली आहे. ‘सस्टेनेबल अर्बन फार्मिंग’ म्हणजे शाश्वत शहरी शेती. पारंपारिक पद्धती वापरून शहरी वातावरणात अन्न आणि फायबर उत्पादनांचे उत्पादन करण्याला यात प्राधान्य दिले जाते.
तर किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय,
‘आरं कुठला आलाय व्यायाम आन् कुठली आलीय जीम…
तशी आमची लै येगळी गावरानी ‘थीम’ !
ताटामधी रोज असतो ताजा भाजीपाला,
चार मुठी घिवुन जातो, कुनीबी आला- गेला…
हृदयाच्या कप्प्यात असतं मानुसकीचं ‘सिम’
तशी आमची लै येगळी गावरानी थिम !”
‘…कधीबी रानात गेलो की माझ्या नाटकासाठी माझा जिगरी दोस्त थळ्या लोखंडेनं ल्हीलेली ही कविता आठवती. खरंच शेतातला ताजा, टवटवीत, हिरवागार भाजीपाला खुडून रातीच्या जेवनात खान्यात जे सुख हाय, ते शब्दांत नाय सांगता येनार! शहरात रहानार्या आनि शेतीशी फारसा संबंध नसलेल्या माझ्या भावा बहिनींनाबी हा आनंद घेता येनं सहज शक्य हाय… कसं..? आवो, ‘सस्टेनेवल अर्बन फार्मिंग’ करून… जरा इस्कटून सांगतो… शहरातल्या प्रत्येकानं आपल्या टेरेसवर, गॅलरीत, कुठल्याबी मोकळ्या जागेत मधी आपल्यापुरतं, छोटं का होईना ‘फार्मिंग’ करून बघा… फायद्यासाठी नाय बरं का.. ‘जाणीव’ म्हनून ! एकतरी भाजी आपली आपन पिकवायची आन् खायाची. ज्या दिवशी हे कराल ना, त्यादिवशी पयला घास पोटात गेल्यागेल्या ‘जगात भारी’ सुखाचा अनुभव घ्याल गड्याहो… करून तर बघा ! – किरण माने.’
किरण माने यांनी शेअर केलेल्या या पोस्टमधून त्यांनी जगभरातील लोकांना स्वतः पिकवा आणि मजेत खा असा सल्ला दिला आहे. आज अनेक लोक आपल्या गॅलरीत, टेरेसवर अशा प्रकारची शेती करताना दिसतात. कडीपत्ता, मिरची, टोमॅटो अशा भाज्यांची लागवड अनेक लोक करतात. यामुळे स्वतः शेती करण्याचा आनंद मिळतोच. शिवाय शेतीची ही परंपरा शहरातदेखील राखता येते. इतकेच नव्हे तर घरातील लहान मुलांना देखील याची आवड लागते, समज येते. तसेच घरात मोकळी हवा खेळते. त्यामुळे ‘सस्टेनेबल अर्बन फार्मिंग’ जितकी सोयीची तितकीच आनंदाची आहे.
Discussion about this post