हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मालिका ते रिऍलिटी शो करत किरण मानेंनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. सातारचा बच्चन अशी त्यांची ओळख आणि एक सातारकर म्हणून ते नेहमीच अभिमान बाळगताना दिसतात. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणं असो किंवा मग एखाद्या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना किरण माने आवर्जून सातारा आणि सातारकरांविषयी बोलतात. साताऱ्यातील हिरकणी महोत्सवात किरण माने यांनी उपस्थिती दर्शवली आणि यानिमित्त त्यांनी पोस्ट शेअर करत पुन्हा एकदा सातारकरांविषयी एक पोस्ट शेअर केली आहे.
किरण माने लिहितात की, ‘सातारकर भावाबहिणींची माझ्यावरची माया अजब हाय भावांनो. काही केल्या आटत नाही. कितीही झालं तरी शेवटी राजधानीची माती. नादच करायचा नाय. सातारी माज.. जसा रांगडेपणानं ठोसेघरच्या धबधब्यासारखा अंगावर येतो, तसंच ‘सातारी प्रेम’बी अक्षरश: गुदमरून टाकणार्या महाबळेश्वरच्या पावसासारखं धो धो बरसणारं… सातारकरांनी एकदा का ठरवलं, की आपल्या भावाचा सन्मान करायचा… की मग करायचाच ! ठरलं की ठरलं. मग मी बिझी आहे, सातार्यात नाही, अशी कारणं सांगून फायदा होत नाही… खरं सांगू का? हे मला खूप आवडतं. माझ्या मातीतल्या माणसांचं माझ्यावर लक्ष आहे… त्यांच्या मायेचं कवच माझ्यावर आहे म्हणून तर भल्या-भल्यांना टक्कर देऊन त्यांची जागा त्यांना दाखवू शकलो. कितीबी संकटं आली तरी आज ताठ मानेनं उभा आहे…’
पुढे लिहिलंय, ‘सातार्यातल्या हिरकणी फाऊंडेशनच्या आमच्या सगळ्या बहिणीही अशाच अतिशय विपरीत परिस्थितीशी झगडा देत ताठ कण्यानं उभ्या आहेत ! कदाचित म्हणूनच त्यांच्या भव्यदिव्य ‘हिरकणी महोत्सवा’त त्यांना माझा सत्कार करायचा होता. मी बाहेरगांवी शुटिंगमध्ये बिझी आहे, हे कारण त्या ऐकायलाच तयार नव्हत्या. त्यांच्या वतीनं आसिफ खान यांनी मला अक्षरश: आग्रह करकरून तिथून आणलं. फटाक्यांच्या माळा लावून स्वागत केलं… आर जे सोनलनं ‘मन सुद्ध तुझं गोष्ट हाये प्रिथवी मोलाची’ हे गाणं माझ्यासाठी गायलं. स्टेजच्या पायर्या चढताना ‘मै हूॅं डाॅन’ गाणं लागलं आणि प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. माझा जोरदार सत्कार करून पुन्हा तितक्याच अगत्यानं सेटवर नेऊन सोडलंही. लै भारी वाटलं’.
पुढे. ‘हिरकणी..च्या सर्वेसर्वा जयश्री शेलार या आर्थिक दुर्बल महिलांसाठी अफाट काम करतात. साताऱ्यातील पहिली ‘पिंकॅथाॅन रन’, पिंक रिव्हाॅल्यूशन कॅन्सर अवेयरनेस प्रोग्राम, कोविड काळात शेकडो रुग्णांसाठी ऑक्सिजन, औषधं, लसी मिळवण्यासाठी जिवाचं रान करणं, कोविडच्या हाहाकारात संसार उध्वस्त झालेल्या विधवा महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणं अशा कामांची यादी संपता संपणार नाही. अशा महिलांनी आवर्जुन माझा सन्मान करणं हे माझ्या संघर्षासाठी खूप मोठं बळ देणारं आहे. सर्वांचे मनापासून आभार !’
Discussion about this post