हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतंच यंदाच्या ‘लता दीनानाथ मंगेशकर’ या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला आहे. याचबरोबर बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन, गायक पंकज उदास, मराठी अभिनेता प्रशांत दामले, प्रसाद ओक यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गायिका उषा मंगेशकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली आहे. दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८१ व्या स्मृतिदिनानिमित्त एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. या प्रसिद्धीपत्रकामध्ये या पुरस्कारांची माहिती देण्यात आली आहे. दिनांक २४ एप्रिल २०२३ रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
यंदाचे या पुरस्कारांचे ८१ वे वर्ष आहे. पुरस्कारांचे मानकरी पुढील प्रमाणे:-
- आशा भोसले – लता मंगेशकर स्मृती पुरस्कार
- पंकज उदास – भारतीय संगीत पुरस्कार
- प्रशांत दामले – नाटक
- प्रसाद ओक – चित्रपट/ नाटक
- विद्या बालन – चित्रपट
- श्री सदगुरू सेवा संघ – समाजसेवा
- ग्रंथाली प्रकाशन – साहित्य (वागविलासिनी पुरस्कार)
मिळालेल्या माहितीनुसार, हा पुरस्कार सोहळा येत्या २४ एप्रिल २०२३ रोजी मुंबईतील पष्णमुखानंद सभागृहात पार पडणार आहे. सायंकाळी ६ वाजता या सोहळ्याची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमांनी होईल. यामध्ये कथक नृत्य, राहुल देशपांडे यांची गाण्यांची मैफील होईन आणि कार्यक्रमाची सांगता ज्येष्ठ गायक हरिहरन यांच्या गायनाने होईल. मंगेशकर कुटुंब गेल्या ३३ वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे हे सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट चालवत आहेत.
या प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो. गतवर्षीपासून, मंगेशकर कुटुंबीय आणि ट्रस्टकडून भारतरत्न लता दीदींच्या स्मरणार्थ ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ दिला जातो. हा पुरस्कार दरवर्षी फक्त एकाच व्यक्तीला दिला जातो आणि या पुरस्काराचे पहिले मानकरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले होते.
Discussion about this post