हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। TDM हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली आहे. असे असूनही विविध ठिकाणी या चित्रपटाला शो दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. अनेक प्रेक्षक TDM चित्रपटाचे कथानक, स्टारकास्ट आणि गाण्यांविषयी बोलताना भरभरून कौतुक करत आहेत. मग प्रेक्षकांना हा चित्रपट आवडत असताना त्याला शो न मिळण्याचं कारण काय..?
चित्रपटाला शो मिळत नाही याच कारण चित्रपट चांगला नाही असे असेल का..? असाही प्रश्न अनेकांना पडला असेल. तर हा चित्रपट का पहावा..? किंवा हा चित्रपट खरंच पाहण्यासारखा आहे का..? या प्रश्नांचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. आम्ही तुम्हाला महत्वाची 5 कारणे देत आहोत ज्यामुळे हा चित्रपट पहायला हवा असे तुम्हाला वाटेल. TDM का पहावा..? हे जाणून घेण्याआधी आपण TDM म्हणजे काय..? ते जाणून घेऊ.
० TDM म्हणजे काय..?
– गावाकडील जगणं अनुभवलेल्या प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारा चित्रपट म्हणजे TDM. गावाकडची जी मुलं- मुली शिक्षण किंवा नोकरीसाठी गाव सोडत नाहीत, मात्र परिस्थितीपुढे शरण न जाता स्वतः गावातच खपून काम करतात, आईबापाला मदत करतात त्या प्रत्येकाची कहाणी म्हणजे TDM. आता कथानक आणि विषय अगदी खोल उलगडायचा म्हटलं तर TDM म्हणजे ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा. गावाकडे अनेक मुलांना ही पदवी माहीत असते, पण ज्यांना हे माहीत नसेल त्यांना चित्रपटाच्या अगदी मध्यापर्यंत हे समजणार नाही. अगदी नावाप्रमाणेच चित्रपटात ट्रॅक्टरचा वापर समर्पकपणे केला आहे.
० TDM का पहावा..?
१) बाबू (पृथ्वीराज थोरात) आणि निलिमाची (कालिंदी निस्ताने) हलकी फुलकी प्रेमकहाणी या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. वयात आलेल्या आणि प्रेमाचे गुलाबी दिवस अनुभवलेल्या प्रत्येकाला बाबू आणि नीलिमामध्ये स्वतःला शोधता येईल. पण त्याहीपलीकडे जाऊन गावाकडची गरिबी, शिक्षणाच्या वाटेतून बाहेर पडलेली तरुण पिढी, वर्षांनुवर्षं चालत आलेलं गावातलं टगेगिरीचं राजकारण, गावाकडची लग्नं, पोरा-पोरींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आई- बाप खात असलेल्या खस्ता, पैशांची तारांबळ आणि या सगळ्यासोबत सुरू असलेला जिंदगीचा रहाटगाडा नेमकेपणाने दाखवण्याचं काम TDM चित्रपट करतो.
२) TDM मध्ये लोकांची भाषा, त्यातला शिवराळपणा, राहणीमान, रस्ते, गाड्या या सगळ्यांची परफेक्ट भट्टी जमून आलेली आहे. शिवाय ट्रॅक्टरवर वाजवली जाणारी गाणी तुम्ही या चित्रपटात एन्जॉय करू शकता. चित्रपटातली गाणी ‘एक फुल’ आणि ‘मन झालं मल्हारी’ ही तुम्हाला नव्याने प्रेमात पाडतील यात तर शंकाच नाही. तर बकुळा हे गाणं लग्न करून सासरी निघालेल्या मुलीला साद घालणारं म्हणून लक्षात राहील. माहेरची साडी या गाण्यानंतरचा जिवंतपणा बकुळाने प्रेक्षकांसमोर आणला आहे.
३) कॅमेरा, लोकेशन्स आणि चित्रपटातील पात्रांची निवड ही आणखी एक जमेची बाजू म्हणता येईल. चित्रपटाच्या नायक- नायिकेचं हे पदार्पण असलं तरी दोघांच्याही अभिनयात तो नवखेपणा जाणवत नाही. रोजच्या जगण्यातील सहजपणा त्यांच्यात दिसून येतो म्हणूनच ही गोष्ट प्रेक्षकांना आपली वाटते. सहकलाकार म्हणून भूमिका मिळालेल्या प्रत्येकाने आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. कुठल्याही प्रस्थापित किंवा प्रशिक्षित अभिनेता किंवा अभिनेत्रीला न घेता अधिक जिवंत, वास्तव चित्रपट साकारलेला आहे.
४) भाऊराव कऱ्हाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन इतके कमाल केले आहे कि, चित्रपटात कुठेही कसलीही अतिशयोक्ती, जबरदस्ती किंवा विषयाचं दडपण येत नाही. शिवाय चित्रपटात अनावश्यक झगमगाट किंवा गोंगाट नाही. अतिशय साधे सरळ रोजच्या जीवनात घडणारे प्रसंग अन त्यांची मांडणी पाहून एक कम्फर्ट झोन आपोआपच तयार होतो.
५) गावाकडच्या लोकांनी आपलं रोजचं जगणं पडद्यावर पाहण्यासाठी आणि शहरी लोकांनी गावगाडा समजून घेण्यासाठी हा चित्रपट पाहिला तर गाव- शहर यामधील उरली सुरली अदृश्य फळीदेखील पार करून विचार करायला भाग पडणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे सुट्टीचा दिवस किंवा विकेंडची वाट पाहण्यापेक्षा समजून उमजून घेण्यासाठी म्हणून हा चित्रपट पहायला हवा. शिवाय सहज, सुंदर या कलाकृतीचा आनंद घेण्यासाठी आणि अस्सल कलाकारांच्या मेहनतीला एक सलाम ठोकण्यासाठी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन जरूर पहा
Discussion about this post