हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बुधवारी संपूर्ण राज्यभरात गुढी पाडव्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी शोभा यात्रांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये अनेक मराठमोळ्या कलाकारांनी सहभाग घेतला होता. काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. असे असताना मराठी सिने विश्वातील अत्यंत नावाजलेले कोठारे कुटुंब मात्र एका गोष्टीमुळे ट्रोल झाले आहे. पाडव्याच्या दिवशी हिंदु नव वर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. यानिमित्त लोकांच्या घरात गोडधोड पदार्थ बनवले जातात. पण कोठारे मात्र याला अपवाद आहेत. कारण पाडव्यानिमित्त त्यांनी चक्क घरात मटणाचा बेत केला होता आणि यामुळे कोठारे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत.
दिग्गज अभिनेते महेश कोठारे यांचा मुलगा अभिनेता आदिनाथ कोठारे याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो स्वतः आणि त्याचे वडील म्हणजे महेश कोठारे किचनमध्ये दिसत आहेत. या व्हिडिओत तो म्हणतोय, ‘आम्हाला गुढीपाडवा सर्वात जास्त का आवडतो तर याचं कारण म्हणजे जेवण. आज आपल्या घरी जेवायला काय केलंय दाखवा डॅडू.’ यानंतर महेश कोठारे अत्यंत उत्साहाने पातेल्यावरचं झाकण काढून म्हणतात, ‘हा आहे साखर भात आणि साखर भाताबरोबर उत्कृष्ट कॉम्बिनेशन ते म्हणजे मटण’.
याशिवाय कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे की, ‘तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या पोट भरून शुभेच्छा! तुमच्या माहितीसाठी – कोठारे हे पाठारे प्रभू आहेत. काही खास दिवशी साखर भात आणि मटण खाण्याची ही आमची २०० वर्षांपेक्षा जुनी प्रथा आहे. ही आपल्याकडील एक सुंदर परंपरा आहे आणि विविध समुदायांमध्ये भिन्न प्रथा आहेत हे पाहणं खूप सुंदर आहे. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.’ हा व्हिडिओ पाहून नेटकरी चांगलेच खवळले आहेत. एकाने म्हंटले आहे, ‘गुढी पाडव्याला मटण कोण खात..?’ तर आणखी एकाने म्हंटलय, ‘महेश कोठारे तर इंग्रजाळलेले आहेतच.. म्हणून पोरग पण.. अजिबात आवडलं नाही.’ अन्य एकाने लिहिले, ‘एक दिवस तरी त्या मुक्या जीवाला सोडायचं होत..’ तर एका नेटकऱ्याने थेट कोठरेंना ‘ तुम्ही नालायक आहात ‘ असे म्हंटले आहे.
Discussion about this post