हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। निर्माता आणि दिग्दर्शक स्वप्नील गायकवाड हे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एक मराठी शॉर्ट फिल्म घेऊन येत आहेत. या शॉर्ट फिल्मचे नाव ‘क्रमणिका’ असे आहे. रविवारी ८ ऑगस्ट २०२१ रोजी ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर थोडक्या उपस्थितीत समर्थ फिल्म प्रोडक्शनच्या माळेगावस्थित ऑफिसमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कलाकार यांनी आपली उपस्थिती दर्शविली होती. त्यानंतर आता या शॉर्ट फिल्मचा टीझरदेखील रिलीज झाला आहे. दरम्यान युट्यूबच्या शोध इतिहासात अद्याप क्रमणिका हा शब्द कधीच पाहण्यात आलेला नाही. त्यामुळे इंडस्ट्रीला आम्ही एक नवीन शब्द देतोय, असे दिग्दर्शक स्वप्निल गायकवाड म्हणाले.
या शॉर्टफिल्मची पटकथा, संवाद आणि गाणे विक्रम पिसाळ लिखित आहेत. स्वप्निल यांनी आजवर कुठेही न आलेलं नाव फिल्मला असावे असे त्यांना सांगितले असता त्यांना बरेच दिवस नाव सुचत नव्हते. मात्र पिसाळ यांच्या अनुक्रमणिका नामक कवितेवरुन त्यांनी क्रमणिका हे नाव कसे वाटते अशी विचारणा दिग्दर्शक स्वप्नील यांना केली. पुढे हे नाव त्यांनी काही कथा व कविता लेखकांना ऐकवले. एका शब्दाची फोड करून हे नाव बनवले, असे सांगताच त्या लेखकांनीदेखील हा शब्द कधीच इंडस्ट्रीत वापरलेला नाही, एक नवा शब्द तुम्ही लोकांना देताय असे म्हणत कौतुक केले आणि एका सध्या शब्दाचे शीर्षक झाले. बॉलिवूड इंडस्ट्रीत २०००च्या आसपास गाणी गायलेल्या एका बड्या गायकानेही ‘ऐसा शब्द आजतक कभी किसी गानें और फिल्म में आया नहीं’ अस म्हणत ह्या शीर्षकाचे आणि गाण्याचे कौतुक करत त्याच्या काही ओळी गाऊन पाठवल्या.
या शॉर्ट फिल्मचे छायांकन कृष्णा राऊत, साहिल गार्डे यांनी केले आहे. तर संकलन जयदीप पारधे यांनी केले आहे. शिवाय सहनिर्माता म्हणून रोहित व्हावळ यांनी सूत्र सांभाळली आहेत. तसेच सुरज सोनवणे यांनी संगीत, तर अभिजित SG यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. याव्यतिरिक्त विनोद साळवे यांनी आकर्षक पोस्टर बनविले आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये ‘गस्त’ चित्रपट फेम राज पाटणकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर त्यांच्यासह दिशा मांडरे या मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसतील. सध्या या शॉर्ट फिलच्या टिझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्याचे कारणही तसेच आहे कि, एक वेगळा विषय एक वेगळी कथा ‘क्रमणिका’च्या माध्यमातून प्रेक्षक अनुभवू शकणार आहेत. इतकेच नव्हे तर या शॉर्ट फिल्ममध्ये एक छान गाणंसुद्धा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. त्यामुळे येत्या रविवारी ८ ऑगस्ट २०२१ रोजी हि शॉर्ट फिल्म जरूर पहा असे आवाहन मान्यवरांकडून करण्यात आले आहे.
Discussion about this post