हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता कुशल बद्रिके हा झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी कार्यक्रमातून नेहमीच विविध पात्र साकारत मनात उतरत चाललाय. कॉमेडी करून खळखळून हसवणारा एखादा माणूस खऱ्या आयुष्यात किती प्रॅक्टिकल असू शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे कुशल. तो नावाप्रमाणे अभिनयात जितका कुशल आहे तितकाच तो व्यक्त होण्यातही कुशल आहे. गेले काही दिवस तो मनातले विचार, सल, खंत, आनंद, दुःख आपल्या लेखणीतून व्यक्त करत आहे. अशीच आणखी एक पोस्ट शेअर करत त्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेता कुशल बद्रिकेने हि पोस्ट आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे कि, ‘रात्रभर झोपू न देणारी दुःख सुद्धा असतात माणसाला, मनातली तळमळ अंतरात उतरत जाते हळू… हळू … रात्रभर हे विचारांचं वादळ घेऊन आपलं ह्या कुशीवरून त्या कुशीवर आणि त्या उशीवरून ह्या उशीवर. “वास्तुशास्त्रानुसार” झोपायच्या दिशा आणि जागा बदलून सुद्धा झोप लागत नाही. अश्या वेळी मग आपण स्वतःला बदलायचं. – सुकून’. अशा शब्दात कुशलने प्रत्येकाच्या मनातलय अस्वस्थतेवर फुंकर घातली आहे.
कुशल ‘सुकून’ या नावाने लिहतो आहे. त्याच्या या नावातच सुकून असल्यामुळे त्याच्या लिखाणाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नेटकरी त्याच्या वास्तववादी लिखाणाचे कौतुक करताना दिसत आहेत. कुशलच्या या पोस्टवरही अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याला लिखाण करत राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अनेकांनी आपल्याला त्याचे लेखन आवडत असल्याचेही म्हटले आहे. अभिनयासह कुशलच्या लेखणीने प्रत्येकाच्या आयुष्यातील वास्तविक घटनांना बरोबर टिपले आहे. त्यामुळे कुशलच्या अभिनयप्रमाणे आता त्याच्या लिखाणाचेदेखील फॅन वाढू लागले आहेत.
Discussion about this post