हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनुप जगदाळे यांच्या ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटात विनोदी अभिनेता कुशल बद्रिके हा क्रूरकर्मा ‘कुरबतखान’च्या भूमिकेत दिसणार आहे. हि अतिशय दमदार व्यक्तिरेखा असून यातील कुशलचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.
निखळ विनोद करून प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर एका अतिशय वेगळ्या भूमिकेतून आणि मुख्य म्हणजे पहिल्यांदाच खलनायक म्हणून कुशल प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. त्याच्या या भूमिकेतील लूक अगदी धडकी भरवणारा आहे. या भूमिकेचा अनुभव कुशलसाठी देखील वेगळा आणि आव्हानात्मक ठरला आहे.
तर आपल्या या नव्या आणि पहिल्यांदाच साकारलेल्या खलनायकी भूमिकेबद्दल बोलताना अभिनेता कुशल बद्रिके म्हणाला कि, ‘बहलोलखानचा वफादार आणि शाही सल्तनतीचा राखणदार असलेला ‘कुरबतखान’ हा विजापूरचा क्रूर हेर होता. बघणाऱ्याला चीड येईल अशी ही भूमिका साकारणं हे खरंतर माझ्यातल्या अभिनेत्यासाठी आव्हानात्मक होतं. त्यामुळे दिसण्यातला वेगळेपणा आणि लकबी आत्मसात करून ही भूमिका मी साकारलीय. प्रेक्षकांच्या ती पसंतीस पडेल, अशी मला खात्री आहे’.
शिवाय पोस्टर शेअर करत कुशलने म्हटले आहे कि, ‘खरतर ऐतिहासिक सिनेमां मध्ये “छत्रपती शिवाजी महाराजांचा” एखादा “मावळा” व्हावं आणि स्वराज्याच्या लढ्यात आपण स्वतःला झोकून द्याव असं प्रत्येक मराठी नटाचं स्वप्न असतं, पण “राव-रंभा” ह्या सिनेमात माझ्या नशिबात हा कुरबत खान आला, माझे दिग्दर्शक अनुप जगदाळे सर यांना माझ्यात हा कुरबत दिसला आणि मग नव्या सिनेमाचा प्रवास सुरु झाला. प्रत्येक नवा सिनेमा काहीतरी शिकवून जातो , एक नवीन जीवन, नवीन अनुभव देऊन जातो, मी माझी भूमिका प्रामाणिक पणे करण्याचा प्रयत्न केला पण तरीही इमान महाराजांच्याच पायाशी धाव घेत रहातं’.
येत्या १२ मे २०२३ रोजी इतिहासातील हे ‘मोरपंखी पान’ रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत येणाऱ्या ‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. तर छायांकन संजय जाधव, संकलन फैजल महाडिक यांचे आहे. चित्रपटाचे सहनिर्माते अजित भोसले, संजय जगदाळे आहेत आणि कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. तर गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी गाणी लिहिली असून त्यांना अमितराजने संगीत दिले आहे.
Discussion about this post