हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. यानंतर त्यांच्या पार्थिवावर आता मुंबईतील दादर येथे शिवाजी पार्क मध्ये अंत्य संस्कारांना सुरुवात झाली आहे. कोणत्याही क्षणी लता दीदी आपल्या ब्रह्मलोकाच्या प्रवासास निघतील. लता दीदींना लष्कराकडून शेवटची मानवंदना देण्यात आली आहे. यानंतर पार्थिवावरील राष्ट्रध्वज हा मंगेशकर कुटुंबीयांकडे सुपूर्त करण्यात आला आहे. राष्ट्रध्वज हृदयनाथ मंगेशकर यांनी भरल्या डोळ्याने पाहिला आणि त्यानंतर हातात घेतला. हा कोणताही अंत नसून अमरत्वाची सुरुवात आहे. कारण लता दीदींचे स्वर हे अजरामर आहेत. सुरसम्राज्ञी लता दीदी अनंतात विलीन होणार हि बाब अतिशय हृदयद्रावक आहे.
View this post on Instagram
लता दीदी यांची विशेष बाब म्हणजे, वयाच्या तेराव्या वर्षी वडील दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले. अशावेळी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेताना त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा विचार कधीच केला नाही. लता दीदींचे वय फारसे नव्हते पण खांद्यांमध्ये कुटुंबाची जबाबदारी पेलता येईल इतके बळ सामावलेले होते. लता दीदींनी आपल्या चारही भावंडांचा व्यवस्थित सांभाळ केला. कुटुंबासाठी त्यांनी लग्नदेखील केले नाही. त्यांनी नेहमीच आपल्या कुटुंबाची पाठराखण केली. इतकेच नव्हे तर लता दीदींचे स्वर जितके मधुर तितकीच मधुर त्यांची वाणी होती. लता दीदींचे प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध होई. त्यामुळे आज लता दीदींचे हयात नसणे हि बाब सर्वांच्याच जिव्हारी लागली आहे.
लता दीदींच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत उपस्थित राहिले आहेत. त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना लता दीदींच्या पार्थिवास पुष्प चक्र अर्पण केले. लता दीदींच्या चाहत्यांची फार मोठी गर्दी येथे पाहायला मिळत आहे. सर्वांच्या डोळ्यात अश्रूंचा महासागर दिसत आहे. संपूर्ण वातावरण अत्यंत भावनिक आहे. आता लता दीदींच्या अंत्य संस्कार विधी प्रारंभ झाल्या आहेत. यानंतर त्यांना अग्नी देण्यात येईल आणि लता दीदी अनंतात विलीन होतील.
Discussion about this post