हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महेश कोठारे यांच्या यश-अपयशाची गाथा सांगणारं ‘डॅम इट आणि बरंच काही’ हे पुस्तक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अलीकडेच प्रकाशित करण्यात आले. दादर येथील श्री शिवाजी मंदिर येथे आठवणींच्या हिंदोळ्यावर हा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या ‘डॅम ईट आणि बरंच काही’ पुस्तकाचे लेखन पत्रकार-तारांगणचे संपादक मंदार जोशी यांनी केले आहे. या पुस्तकाचा नुकताच साताऱ्यात लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी किरण माने, माधुरी पवार आणि अन्य साताऱ्यातील कलाकार मंडळी उपस्थित होती.
याविषयी माहिती देताना अभिनेता किरण माने यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर महेश कोठारे यांच्या हस्ते सन्मानित होताना आणि पुस्तकाचे लोकार्पण करतानाचे फोटो शेअर केले आहेत. यासोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘सातार्याच्या ग्रंथमहोत्सवात महेश कोठारेंच्या हस्ते माझं रेखाचित्र मला देऊन माझा सत्कार करण्यात आला. महेश कोठारेंच्या ‘डॅम इट आणि बरंच काही’ या आत्मचरीत्राचा लोकार्पण सोहळा माझ्या हस्ते पार पडला. यावेळी मी महेश कोठारेंशी संवाद साधण्याबरोबरच बिगबाॅसमधले अनुभव सातारकर प्रेक्षकांशी शेअर केले’.
अलीकडे गाजलेल्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वत किरण माने टॉप ३ मध्ये पोहोचले होते. मात्र जिंकू शकले नाहीत. तरी सातारकरांचे समर्थन आणि प्रेम खेळात हरण्यापेक्षा अधिक लाखमोलाचे ठरले. खेळात किरण माने हरले पण लाखों प्रेक्षकांची मनं त्यांनी जिंकली. ठिकठिकाणी पोस्टर आणि बॅनर्स लावून चाहत्यांनी आपले प्रेम व्यक्त केले आहे. या प्रेमासाठी किरण माने यांनी चाहत्यांचे आभारदेखील मानले आहेत. बिग बॉस मराठीआधी किरण माने यांनी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून विशेष प्रसिद्ध मिळवली होती. मात्र निर्माते आणि सहकलाकारांसोबत झालेल्या वादविवादामुळे तसेच सोशल मीडियावर परखड पोस्ट्समुळे माने नेहमीच प्रकाशझोतात राहिले आहेत.
Discussion about this post