हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राची शान लावणी कला विश्वातून अत्यंत दुःखद अशी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध आणि लोकप्रिय ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. मुंबईतील राहत्या घरी त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळत आहे. सुलोचना चव्हाण यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी त्यांच्या निधन वार्तेला दुजोरा दिला आहे. सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे लोककलेचे एक महान पर्व संपल्याचे दुःख मनोरंजन विश्वाला सहन करावे लागत आहे. त्यांनी ६० वर्षांहून अधिक काळ लोककलेचा वारसा जपला आहे.
लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा जन्म 13 मार्च 1933 रोजी झाला आणि वयाच्या 9 व्या वर्षीच त्यांनी पहिलं गाणं गात संगीताचा पाया रचला. ‘तुझ्या उसाला लागलं कोल्हा’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना’, ‘पदरावरती जरतारीचा’, ‘कसं काय पाटील बरं हाय का..?’ यासारख्या अनेक दर्जेदार लावण्या सुलोचना चव्हाण यांनी आपल्या ठसकेबाज आवाजात सुरेलबध्द केल्या आहेत. आज जरी सुलोचना चव्हाण हयात नसल्या तरीही त्यांचा आवाज अमर आहे. त्या नेहमीच चिरंतर स्मरणात राहतील अशी त्यांची कारकीर्द आहे.
याचवर्षी लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना कला क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय २०१० साली त्यांना लता मंगेशकर पुरस्कार, २०१२ साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सुलोचना चव्हाण यांनी केवळ लावण्याचं नव्हे तर जवळपास ७० हिंदी चित्रपटासाठी अनेक अल्बम गाणी रेकॉर्ड केली होती. यामध्ये ‘चोरी चोरी आग सी दिल में लगा के’, ‘मौसम आया है रंगे’, ‘वो आए है’ अशा अनेक गाण्यांचा समावेश आहे.
Discussion about this post