हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक झाल्याची माहिती गुरुवारी मिळाली. रत्नागिरीतील गणपतीपुळे येथील एका हॉटेलात ऑनलाइन हॉटेल बुकिंगच्या माध्यमातून तब्बल १७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा हा प्रकार उघडकीस आला. मधुराणीचे पती म्हणजेच प्रमोद प्रभूलकर यांनी एक व्हिडओ शेयर करत याबाबत माहिती दिली. यानंतर आता मधुराणी या प्रकरणावर व्यक्त झाली आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी गणपतीपुळे येथील ग्रीनलीफ रिसोर्ट हॉटेलात प्रभुलकर यांनी २ दिवसासाठी १७ हजार रुपये देऊन बुकिंग केले होते. मात्र तिथे पोहोचल्यावर बूकिंग झाली नसून ते पैसे मधल्या मध्येच गहाळ झाल्याचे समोर आले. यातून आपली फसवणूक झाल्याचे त्यांना समजले. सोबत इतरही काही पर्यटकांचे असेच पैसे गेल्याने हा मोठा ऑनलाईन घोटाळा असल्याचे समोर आले. हे हॉटेल शिवसेना नेते रवींद्र फाटक यांचे असल्याने हे प्रकरण वाऱ्यासारखे पसरले. मात्र यावर अभिनेत्री मधुराणी व्यक्त झालेली दिसली नाही. अखेर आता सोशल मीडियावर ती व्यक्त होताना दिसली आहे.
मधुराणी म्हणते कि, ‘नमस्कार मित्र मैत्रिणींनो, गेले ५ महिने मी जाणीपूर्वक सोशल मीडियावर कार्यरत नाही. पण काही गोष्टींचा खुलासा करण्यासाठी मी ही पोस्ट लिहीत आहे. कालपासून ‘ मधुराणी प्रभुलकर ह्यांना हजारोंचा गंडा ‘ ‘ मधुराणी प्रभुलकर ह्यांची फसवणुक ‘ अशा बातम्या काही नामांकित वृत्तपत्रांच्या पोर्टल्स वर येत आहेत. पण वास्तवात त्यात नमूद केलेल्या गणपतीपुळे येथील हॉटेल मध्ये मी स्वतः गेलेलेच नाही. माझी एक छोटी सर्जरी झाली असल्या कारणाने मालिकेतूनही काही दिवसांची रजा मागून घेऊन मी पुण्यातील माझ्या घरी विश्रांती घेत आहे. आता माझी तब्येत बरीच बरी आहे आणि लवकरच मी मालिकेतून आपल्याला पुन्हा भेटेन. गणपतीपुळ्यातील हॉटेल मध्ये माझी लेक स्वराली आणि प्रमोद दोघच गेले आहेत. तिथे त्यांच्याबरोबर जे घडले ते अत्यंत चूक आहे. काल ह्या सगळ्या मनस्तापामुळे प्रमोदची तब्येत सुद्धा बिघडली आहे. पण दोघे सुखरूप आहेत. त्यांच्या प्रमाणे इतर सुद्धा अनेक जण फसवले गेले आहेत. ह्याचा लवकरात लवकर तपास लगायला हवा आणि ह्या सगळ्यांचे पैसे परत मिळायला हवेत.’
Discussion about this post