हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधून घराघरांत आणि मग प्रेक्षकांच्या मनामनांत पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी गोखले हि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. मालिकेच्या बाबतीतले अपडेट्स देण्यापासून ते आपल्या आयुष्यातील चांगले वाईट प्रसंग, अनुभव ती आपल्या चाहत्यांसह शेअर करत असते. अनेकदा परखड मत मांडणाऱ्या पोस्ट शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष वास्तवाकडे वेधण्याचा प्रयत्न करताना दिसते. दरम्यान एका मुलाखतीतील एक व्हिडीओ शेअर करत तिने स्त्रियांना समाजात वावरताना घातलेल्या बंधनांवर वक्तव्य केले आहे.
अभिनेत्री मधुराणी गोखलेची हि पोस्ट सध्या चाहत्यांच्या आकर्षणाचं मुख्य केंद्र ठरताना दिसते आहे. या पोस्टमध्ये मधुराणीने स्त्रियांना आजही समाजात दिली जाणारी वागणूक, घातली जाणारी बंधने याबाबत मन मोकळं केलं आहे. ठाणे वैभवला दिलेल्या एका मुलाखतीतील हा छोटासा भाग तिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘स्त्री जन्माला येत नाही तर ती ‘घडवली ‘जाते’ सिमोन दि बोव्हा ह्या फ्रेंच विचारवंत लेखिकेच्या ‘ The Second Sex ‘ ह्या पुस्तकातलं सर्वात महत्त्वाचे हे वाक्य. स्त्री विषयी बोलताना ह्या ओळीच्या उल्लेखानेच होऊ शकते. विचार करणाऱ्या प्रत्येक स्त्रीने हे वाचायलाच हवं’.
या मुलाखतीत बोलताना मधुराणी म्हणाली कि, ‘स्त्री ही जन्माला येत नाही, स्त्री घडवली जाते आणि ती वेगवेगळ्या आपल्या संस्कारांमधून घडवली जाते, समाज तिला घडवतो. आपला समाज किंवा परंपरा ठरवते की स्त्रीने अमुक पद्धतीने वागायला पाहिजे, तमुक पद्धतीने वागायला पाहिजे. असं असेल तरच तिला समाजात स्थान आहे. ती आदर्श आहे. तिने सगळ्यांना आनंदी ठेवलंच पाहिजे. तिने वर तोंड करून बोलता कामा नये. तिने दुरुत्तरे देऊन चालणार नाही, तिने प्रश्न विचारून चालणार नाही. तिने पुरुषाच्या मग तो वडील असेल भाऊ असेल किंवा तिचा नवरा असेल त्यांच्या एक स्टेप मागेच असायला हवं.
तिला यशस्वी होण्याचीही परवानगी नाहीये. यशस्वी स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोनही काही ठिकाणी विकृत आहे. प्रत्येक स्त्रीला तिच्या इच्छेनुसार जगायचं असतं. पण समाजाने घालून दिलेले काही नियम असतात.’ मधुराणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि यावर विविध ठिकाणाहून स्त्रिया आपापली मते मांडताना दिसत आहेत.
Discussion about this post