हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रसिक प्रेक्षकांना जागतिक दर्जाच्या चित्रपटांची मेजवानी देणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा २ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरु झाला आहे. हा महोत्सव ९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सुरु राहणार असून यंदाचे हे वर्ष महोत्सवाचे २१ वे वर्ष आहे. थिएटर अकादमी, सकल ललित कलाघर, मुकुंदनगर येथे महोत्सवाचा उदघाटन समारंभ झाला आणि अनेक रसिकांनी या महोत्सवाला मोठा प्रतिसाद दिला. यंदा हा केवळ चित्रपट महोत्सव नसून मनोरंजन विश्वातील विविध विषयांवर अनेक दिग्गज उपस्थितांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत.
या महोत्सवात सेलिब्रिटींचीदेखील उपस्थिती लाभली आहे. अलीकडेच बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने या महोत्सवात सामील झाले होते. सोमवारी दुपारच्या सुमारास माधुरी दीक्षित यांच्या आरएनएम मुव्हींग पिक्चर्सची निर्मिती असलेला पंचक हा मराठी चित्रपट महोत्सवादरम्यान मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभागात दाखविला गेला. या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान माधुरीने स्क्रीनला आपल्या चित्रपटाच्या टीमसह भेट दिली. यावेळी त्यांचे पती आणि चित्रपटाचे सहनिर्माते म्हणून डॉ. श्रीराम नेने देखील उपस्थित राहिले होते.
यावेळी माधुरी आणि डॉ नेने यांनी उपस्थितांसोबत चित्रपटाचा आस्वाद घेतला. माधुरीच्या येण्याने प्रेक्षकांमध्येही वेगळाच उत्साह पहायला मिळाला. इतकेच नव्हे तर या दिवशी ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक शाजी करुण यांनीही सिनेमा बनविताना त्यातील मोकळ्या जागेचा कलात्मक वापर हेच खरे कौशल्य असे अधोरेखित करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यंदा या महोत्सवात होणारी व्याख्याने आणि मार्गदर्शनपर बातचीत प्रेक्षकांचे लक्ष आणखीच वेधून घेत आहे.
Discussion about this post