हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याचे वडील कृष्णा घट्टामनेनी यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. महेश बाबूचे वडील कृष्णा घट्टमनेनी हे प्रसिद्ध तेलुगु अभिनेते होते आणि त्यांना सुपरस्टार कृष्णा या नावाने ओळखले जायचे. निधनादरम्यान त्यांचे वय ७९ होते. हि बातमी सोशल मीडियावर पसरताच महेश बाबूच्या चाहत्यांनी सांत्वनपर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी १४ नोव्हेंबर २०२२ रोजी हृद्यविकाराचा तीव्र झटका आल्याने कृष्णा घट्टामनेनी यांचे निधन झाले. हैदराबाद येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांना प्रतिसाद न दिल्यामुळे मंगळवारी १५ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ४ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाईएस जगन मोहन रेड्डी यांनी दिग्गज अभिनेते कृष्णा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी कृष्णा घट्टामनेनी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी घट्टामनेनी यांच्या फिल्म इंडस्ट्रीतील कारकिर्दीला उजाळा दिला आहे. महेश बाबूच्या वडीलांच्या निधनामूळे सोशल मीडियावरदेखील शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महेश बाबूच्या वडीलांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महेश बाबूच्या कुटुंबासाठी हा मोठा धक्का असून दोन महिने आधीच त्याने आईला गमावले आहे. या दुःखातून सावरण्याआधीच हा दुसरा झटका त्याला लागला आहे.
Discussion about this post