हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनामनांवर राज्य करणारे व सुरांची मैफिल जमविणारे नाव म्हणजे महेश काळे. लहानापासून वृद्धापर्यंत सारेच ज्यांच्या सुरात मंत्रमुग्ध होतात असे हे व्यक्तिमत्व. महेश काळे आपल्या अद्वितीय सुरांच्या सादरीकरणातून असंख्य रसिकांच्या पसंतीस उतरले. त्यांची स्वरमैफल ही जणू रसिकांसाठी सुश्राव्य पर्वणीच ठरते. अनेक दर्दी त्यांची तुलना प्रख्यात गायक भीमसेन जोशी यांच्याशी करतात. पण गर्दीतल्या प्रत्येकाला हि अशी तुलना कशी बर खपेल? यावरूनच काहींनी महेश काळे यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्याचा वसा घेतला. मग काय? काळेंनी सुद्धा कोणतीही मर्यादा न ओलांडता ट्रोलर्सला उत्तर दिले. कोण ऐकत कोण तुला असे विचारणाऱ्याला ‘असाच दिला आवाज देवाने, काय करू आता?’ असे विचारून ते पुरून उरले.
महेश काळेंनी आपला एक फोटो फेसबुकवर शेअर केला. त्यांच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. मात्र काहींनी हा फोटो सोडून त्यांच्या गायन शैलीवरून त्यांना ट्रोल करण्याचा पुरता प्रयत्न केला. ‘भीमसेन एकच होऊ शकतात. तू तर नाकात गातो एवढं कर्कश़ कोण ऐकतं कोण तुला? अशा शब्दात एकाने महेश काळेंना ट्रोल केले. या ट्रोलरला त्यांनी अगदी संयमाने उत्तर देत शांत केले. ‘खरं आहे, एकच होऊ शकतात ते. असाच आवाज देवाने दिला आहे तर काय करु आता. मला पण कळत नाही का आवडतो लोकांना ते तुम्ही सुखरुप रहा,’ काळेंनी अशा शब्दांत कमेंट करून या ट्रोलरची बोलतीच बंद केली.
आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर राज्य करणारे महेश काळे यांची संगीतकार अशीही एक ओळख आहे. त्यांनी ‘नकुशी’ या मालिकेसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. ‘नकुशी.. तरीही हवीहवीशी’या मालिकेचे टायटल सॉन्ग त्यांनी संगीतबद्ध केले आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाण्यांमुळे महेश काळे हे नाव सर्वदूर पोहोचले. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गायक हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच सूर नवा ध्यास नवा या मराठी सिंगिंग शो चे परीक्षक म्हणून ते कार्यरत आहेत.
Discussion about this post