हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचे चौथे पर्व ५० दिवसांचा टप्पा पार करून पुढे दणक्यात चालू आहे. या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेले जवळपास सगळेच स्पर्धक खेळाच्या दृष्टिकोनातून फक्त आणि फक्त जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत. आता फक्त जिंकायचं एव्हढंच ध्यानी मनी ठेवून हे स्पर्धक वाट्टेल त्या थराला जाताना दिसत आहेत. या आठवड्यात तर स्पर्धकांनी खेळात जीव झोकून देता देता नियमांची पायमल्ली केली. ज्यामुळे बिग बॉसच्या प्रॉपर्टीचेही नुकसान झाले आणि स्पर्धकही त्रासले. म्हणूनच या आठवड्याच्या चावडीवर महेश मांजरेकर एकेकाची शाळा घेणार आहेत.
प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी बिग बॉस मराठीचे शो होस्ट महेश मांजरेकर स्पर्धकांना त्यांच्या चुका दाखवून सुधारण्याचा सल्ला देताना दिसतात. पण जेव्हा हे स्पर्धक हाताबाहेर जातात आणि हैदोस घालतात तेव्हा मात्र मांजरेकर त्यांना चावडीवर झाडायचं काम करतात. कुणाची शक्ती जास्त आणि कुणाची बुद्धी जास्त यापेक्षा दोन्ही समतोल राखून खेळा हि समज देण्यासाठी मांजरेकरांची चावडी प्रसिद्ध आणि तितकीच लोकप्रिय आहे. आठवड्याभराच्या खेळीपेक्षा चावडी कधी भरणार याचीच अनेकांना उत्सुकता असते.
या आठवड्यात स्पर्धक अमृता धोंगडेने कॅप्टन्सी उमेदवारीच्या नादात जेलचा दरवाजा तोडला. ज्यामुळे बिग बॉसने तिला २ आठड्यासाठी कॅप्टन्सी न मिळण्याची शिक्षा दिली. याशिवाय गेल्या टास्कमध्ये रोहित आणि विकास हाणामारीवर उतरले. ज्यामुळे दंड म्हणून बिग बॉसने त्यांना जेलची शिक्षा सुनावली. यानंतर आज जेव्हा चावडी भरेल तेव्हा मांजरेकर या सदस्यांची कानउघाडणी करताना दिसतील. शिवाय इतरही काही सदस्यांचे कान टोचताना दिसतील. त्यामुळे आजची चावडी प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.
Discussion about this post