हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून मराठी सिने सृष्टीतील अनेक निर्माते आणि दिग्दर्शक इतिहासाकडे वळल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्राचे आद्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी लोकांना भरभरून सांगता यावं आणि महाराजांच्या मावळ्यांच्या शौर्यगाथा त्यांच्या आजच्या पिढीला माहित व्हाव्या यासाठी हा सारा अट्टाहास केला जातो. मात्र मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी ऐतिहासिक चित्रपट तयार करणाऱ्यांवर टीकास्त्र डागले आहे. या चित्रपटांविषयी एक वेगळे आणि धक्कादायक मत त्यांनी व्यक्त केले आहे.
टिळेकर म्हणाले कि, ‘खरा इतिहास वाचून समजून घ्यावा.. दोनच दिवसांपूर्वी माझ्या एका हितचिंतक मित्राने मला सुचवले की मी गाव तसं चांगलं ‘वन रूम किचन, हवाहवाई सारखे कौटुंबिक, विनोदी सिनेमे केले आता पुढचा सिनेमा ऐतिहासिक करावा आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर असावा. यावर मी त्याला माझं स्पष्ट मत सांगितलं. ऐतिहासिक सिनेमा तो ही महाराजांच्यावर करायचा तर ते शिवधनुष्य पेलण्याची कुवत माझ्यात नाही आणि बॉलिवूड मध्ये जसं हिरोची एन्ट्री हवेतून उडी मारत गुंडांना मारहाण करत होते.तशी ऐतिहासिक पात्रे दात ओठ खात, बेंबीच्या देठापासून किंचाळत सिनेमातून दाखवणं मनाला पटत नाही.लोकांना आकर्षित करण्यासाठी गल्ला भरण्यासाठी ऐतिहासिक सिनेमात मसाला भरून पुढच्या पिढीला सिनेमातून चुकीचा इतिहास दाखवण्याचं पाप करण्यापेक्षा खरा इतिहास पुस्तकातून वाचून समजावा म्हणून मी इतरांना पुस्तके भेट देईन.’
‘माझं सगळं ऐकून घेऊन मित्राने पुन्हा सल्ला दिला की मला जर चांगला फायनान्स मिळाला तर काय हरकत आहे असे सिनेमे करायला… पण फायनान्स मिळतोय म्हणून स्वतःच्या सोयीप्रमाणे इतिहास बदलून केवळ पैसे मिळवण्यासाठी धंदाच करण्याच्या हेतूने ऐतिहासिक सिनेमा केला तर लोकांच्या शिव्या मिळतीलच.पण जेंव्हा जेंव्हा कुठेही महाराजांची प्रतिमा दिसेल, त्यांचे चित्र समोर येईल तेंव्हा ज्यांच्यामुळे आज आपण आहोत त्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी ,त्याचा पराक्रम, इतिहासाशी मी प्रतारणा केल्याचं शल्य मला कायम बोचत राहणार, ती जखम अश्वत्थामाच्या जखमेसारखी मरेपर्यंत न भरून येणारी असेल.’
‘सिनेमॅटिक लिबर्टी घेत धंदेवाईक सिनेमा करून पैसा कमवणे एकवेळ मला मान्य आहे पण खोटा इतिहास ,खोट्या घटना दाखवून सिनेमा करून आपला मोठेपणा मिरवत लोकांचे पैसे लुटून त्यांच्या नजरेत दरोडेखोर म्हणून आपली ओळख आपणच का निर्माण करून द्यावी..? महाराज आज असते तर आपल्याला दरोडेखोर म्हणून तोफेच्या तोंडी दिलं असतं की कडेलोट केला असता याची क्षणभर कल्पना करून पहा. माझ्या मित्राला माझे हे म्हणणे पटले आणि त्याच्या मुलांना खऱ्या इतिहासाची ओळख व्हावी म्हणून तो त्यांना पुस्तकं वाचायला देणार आहे. मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीला वाचन करण्याचीही सवय या निमित्तानं आपण सर्वांनी करून द्यायला काय हरकत आहे.’ अशी महेश टिळेकर यांनी केली आहे.
Discussion about this post