हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मराठी मनोरंजन विश्वात जणू लगीन सराईचा ऋतू आलाय. गेल्या काही दिवसांपासून सलग मराठी कलाकारांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीलाच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा कायमचा एकमेकांत जीव गुंतला तर आशय कुलकर्णी आणि सानिया गोडबोले यांच्या लग्नाचा बार उडला. त्यानंतर ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ मालिका फेम अभिनेता सुमित पुसावळेने मोनिकासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता पावनखिंड चित्रपटातील ‘बर्हिजी नाईक’ भूमिका साकारणारा मराठी अभिनेता हरिश दुधाडे याचं देखील शुभमंगल सावधान उरकलं आहे.
अभिनेता हरीश दुधाडे याने मॉडेल म्हणून कार्यरत असलेल्या समृद्धी निकमसोबत लग्नगाठ बांधली आहे. हरीश आणि समृद्धीच्या लग्नाला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. हरीश मूळचा अहमदनगर जिल्यातील आहे आणि त्याची पत्नी समृद्धीदेखील अहमदनगरचीचं कन्या आहे. हरीशने सोशल मीडियावर आपल्या लग्नाचा फोटो शेअर करत ‘… आणि नवा प्रवास सुरु झाला’ असे कॅप्शन देत वेडिंग, वेडिंग डे, हॅप्पीली मॅरीड असे हॅशटॅग दिले आहेत. हरीश नगरहून पुण्याला शिक्षणासाठी आला होता. पण त्यांनतर त्याने आपल्या आवडीच्या क्षेत्रात नशीब आजमावलं आणि त्याला यश मिळालं. पुण्यात सिंहगड कॉलेजमध्ये शिक्षण घेताना त्याला अभिनयाचं वेड लागलं आणि इथून त्याचा एक नवा प्रवास सुरु झाला.
नाटक, चित्रपट, मालिका असा १२ ते१४ वर्षांपासूनचा तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेतून हरिशने मनोरंजन विश्वात पदार्पण केले आणि प्रेक्षकांच्या मनातही शिरकाव केला. पुढे ‘नकळत सारे घडले’, ‘सरस्वती’, ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकांमध्येही तो अत्यंत महत्वाच्या भूमिकेत दिसला. मालिकांबरोबर हरिशनं मराठी सिनेविश्वातही चांगली पकड धरली. ‘पावनखिंड’, ‘शिवप्रताप गरुडडझेप’, ‘फत्तेशीकस्त’, ‘फर्जंद’ अशा ऐतिहासिक चित्रपटांत काम करत त्याने जम बसवला. यानंतर सध्या हरिश रत्नाकर मतकरी लिखीत ‘काळी राणी’ या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. काळी राणी या नाटकामध्ये हरिश याच्याबरोबर मनवा नाईक आणि डॉ. गिरीश ओक यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
Discussion about this post