हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। उत्तम अभिनेता आणि सोबतच उत्तम दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुबोध भावे लवकरच एका नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘कट्यार काळजात घुसली’ या अजरामर संगीत नाटकावर आधारित चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर अभिनेता सुबोध भावे ‘संगीत मानापमान’ हे अजरामर नाटक रुपेरी पडद्यावर घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘मानापमान’ असून हा चित्रपट पुढील वर्षी दिवाळीत प्रदर्शित केला जाणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपटाचे टीझर पोस्टर लाँच करण्यात आले आहे.
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी संगीत मानापमान नाटक लिहिले होते, तर शिरीष गोपाळ देशपांडे या चित्रपटाची पटकथा लिहित आहेत. तर सुनील फडतरे हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. नाटकाचे संगीत गोविंदराव टेंबे यांनी केले होते, तर चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन शंकर-एहसान-लॉय करणार आहेत. नमन नटवरा सारखी नांदी या नाटकाने दिली होती. तर नाही मी बोलत नाथा, चंद्रिका ही जणू, शुरा मी वंदिले, युवतीमना दारुण रण अशी उत्तमोत्तम पदं नाटकात होती. ही पदं आजही तितकीच लोकप्रिय आहेत. १९११ मध्ये हे नाटक रंगमंचावर आले होते, त्यात बालगंधर्वांची प्रमुख भूमिका होती. आता चित्रपट रुपात हे नाटक येत असताना कोण कलाकार असतील याची उत्सुकता निर्माण होणे अगदीच स्वाभाविक.
कट्यार काळजात घुसलीद्वारे सुबोधने दिग्दर्शकीय क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले होते. शंकर-एहसान-लॉय यांनी नाट्यपदांसह सूर निरागस हो, अरुणि किरणी अशी उत्तमोत्तम गाणी कट्यारमधून दिली होती. त्यामुळे संगीत मानापमान नाटकातील कोणती पदं चित्रपटात येणार, नवी गाणी असणार का असे अनेक प्रश्न आहेत. जागतिक पातळीवर “कट्यार काळजात घुसली” या चित्रपटाला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाली. त्याप्रमाणेच “मानापमान” या चित्रपटाला देखील पसंती मिळेल आणि श्रवणीय संगीताची रसिक प्रेक्षकांना मेजवानी मिळेल, असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
Discussion about this post