हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शिवछत्रपती शिवाजी महाराज कि……हे इतकं सुद्धा जयजयकार करण्यासाठी पुरेसे आहे. कारण जेव्हा राजे डोळ्यासमोर येतात तेव्हा उर अभिमानाने आणि डोळे त्यांच्या आठवणीने भरुन वाहू लागतात. रयतेचा राजा कसा असावा तर माझ्या शिवरायांसारखाच असे आजही पुढच्या पिढीला गर्वाने सांगितले जाते. अशा या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी आपला जीव ओवाळून टाकला आणि याच शिलेदारांच्या शौर्याची कथा घेऊन ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिका लवकरच स्टार प्रवाह वाहिनी आपल्या भेटीला घेऊन येत आहे. या मावळ्यांपैकी एक जिगरबाज मावळा ज्याने राजे म्हणून मरण हसत हसत मान्य केले तो म्हणजे शिवा काशीद आणि या मावळ्याची भूमिका अभिनेता विशाल निकम साकारणार आहे.
छत्रपती शिवरायांची भूमिका मराठमोळा अभिनेता भूषण प्रधान, बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत अजिंक्य देव आणि नेताजी पालकरांच्या भूमिकेत कश्यप परुळेकर हे कलाकार दिसणार आहेत. तर अभिनेता विशाल निकम निधड्या छातीचा मावळा शिवा काशिद यांची भूमिका साकारणार आहे. शिवा काशिद हे स्वराज्याच्या इतिहासातले ते पान आहे ज्याचे विस्मरण कदापि शक्य नाही. शिवरायांचा हा मावळा हुबेहुब शिवरायांसारखाच दिसायचा असे म्हटले जाते. महाराज जेव्हा पन्हाळ गडावर नजर कैदेत होते तेव्हा त्यांची सुटका करण्यासाठी शिवा काशिद यांनी छत्रपती शिवरायांचे सोंग घेऊन आपल्या राजाचा जीव वाचवला होता. या घटनेमूळे त्यांना दुसरे शिवराय असेही म्हटले जाते. याच जिगरबाज आणि बेधडक शिवा काशिद यांच्या शौर्याची गाथा साकारण्यासाठी अभिनेता विशाल निकम सज्ज आहे.
https://www.instagram.com/p/CPHmypUlJT4/?utm_source=ig_web_copy_link
स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची आहे. तर येत्या २६ जुलै २०२१ पासून रात्री १० वाजता छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची ही गोष्ट आपल्या भेटीला येणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना अभिनेता विशाल निकम म्हणतो कि, ‘स्टार प्रवाहने दिलेल्या या संधीसाठी मी खूपच आभारी आहे. याआधी स्टार प्रवाहच्या साता जल्माच्या गाठी आणि दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले आहे.
आता जय भवानी जय शिवाजी मध्ये शिवा काशिद साकारण्याची जबाबदारी आहे. स्वराज्य हे एकच स्वप्न उराशी बाळगून हजारो मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. याच लढवय्या मावळ्यांची गोष्ट या मालिकेतून उलगडणार आहे. इतिहास जिवंत होतोय असे म्हटले तरी चालेल. शिवा काशिद यांच्या शौर्याविषयी आपण ऐकले आहे. जय भवानी जय शिवाजी मालिकेच्या निमित्ताने ते प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. मी या नव्या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे.
Discussion about this post