हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतून अत्यंत वेदनादायी आणि दुःखद बातमी समोर येतेय. नव्वदीच्या काळात अंबाक्का या भूमिकेतून प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणाऱ्या मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचे आज सकाळी निधन झाले आहे. हि बातमी समोर येताच मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. निधनादरम्यान अभिनेत्री प्रेमा किरण या फक्त ६१ वर्षांच्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, १ मे २०२२ रोजी रविवारी सकाळी पहाटेच्या दरम्यान त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले आणि हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांना भावपूर्ण श्रद्धांजली.#ZeeYuva #PremaKiran pic.twitter.com/WrKYQmLjXN
— Zee Yuva (@Zee_Yuva) May 1, 2022
अभिनेत्री प्रेमा किरण यांच्या अंबाक्का आणि आवडाक्का या अतिशय गाजलेल्या भूमिका होत्या. दरम्यान लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत प्रेमा यांनी काम केले होते. त्यांची प्रत्येक भूमिका आणि प्रत्येक चित्रपट चांगलाच गाजला आहे. इतकेच काय तर चित्रपटच नाही तर अनेक मालिकांमधूनही प्रेमा यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीतील ‘धुम धडाका’, ‘पागलपन’, ‘अर्जुन देवा’, ‘कुंकू झाले वैरी’ आणि ‘लग्नाची वरात लंडनच्या घरात’ या चित्रपटांचा समावेश आहे. यापैकी ‘धुम धडाका’ चित्रपटातील त्यांनी साकारलेली ‘अंबाक्का’ आणि ‘झपाटलेला’ या चित्रपटात साकारलेली आवडाक्का आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
प्रेमा किरण या सिने इंडस्ट्रीमध्ये फक्त अभिनेत्रीच नाही तर निर्मात्या म्हणून देखील कार्यरत होत्या. यातील १९८९ सालामध्ये आलेल्या ‘उतावळा नवरा’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी स्वतःच केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रग्गड कमाई केली होती. माहितीनुसार, नुकतेच त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे देखील निधन झाले होते. यानंतर त्या पूर्णपणे एकाकी जीवन व्यतीत करीत होत्या. अखेर त्यांनी श्वास सोडला आणि जगाचा निरोप घेतला. प्रेमा किरण यांच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
Discussion about this post