हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा आहे. आज चैतन्याची गुढी उभारत येणाऱ्या नव्या वर्षाचे दिमाखात स्वागत केले जाते. आजच्या या खास दिनानिमित्त मुंबईतील गिरणगावात मोठी शोभा यात्रा निघते. या शोभा यात्रेत दरवर्षी अनेक लोक मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सहभागी होत असतात. हि शोभा यात्रा केवळ आकर्षण म्हणून नाही परंपरा म्हणून दरवर्षी आयोजित केली जाते. दरवर्षी या शोभा यात्रेत मुंबईकरांसह अनेक कलाकार सहभागी होत असतात.
यंदाही शोभा यात्रेची शोभा वाढवण्यासाठी मराठी कलाकार मंडळी मोठ्या उत्साहात शोभा यात्रेत सहभागी झाल्याचे दिसले आहे. आई कुठे काय करते फेम अभिनेता मिलिंद गवळी आणि अभिनेत्री रूपाली भोसले यांनी अस्सल पारंपरिक पोशाख करत गिरगाव शोभा यात्रेत सहभाग घेतला आहे.
याशिवाय अभिनेत्री समृद्धी केळकर, प्रिया मराठे, अभिनेता अभिजीत खांडकेकर अशा अनेक कलाकारांनी मराठमोळा पेहराव आणि अस्सल मराठमोळा साज चढवत या शोभा यात्रेत सहभाग घेतला आहे.
हे कलाकार मंडळी शोभा यात्रेत सहभागी होत या परंपरेचा एक भाग झाले आहेत. त्यांचा उत्साह आणि आनंद चेहऱ्यावर झळकतो आहे. गिरगाव शोभा यात्रेत गुढी पाडव्याचे निमित्त साधून मराठी परंपरेचे आणि अस्मितेचे जतन करण्याचा संदेश दिला जातो. यावेळी मोठमोठ्या रांगोळ्या, पारंपरिक ढोलवादन, लोककलेचे प्रकार, मराठी संस्कृती दर्शक रथ आणि मराठमोळ्या ढंगात ‘मी मराठी’ हा अभिमान बाळगणारे हजारो तरुण या शोभा यात्रेत सहभागी झाल्याचे दिसते.
Discussion about this post