हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वाला ‘चेकमेट’, ‘रिंगा रिंगा’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘तू हि रे’, ‘गुरु’, ‘ये रे ये रे पैसा’ असे अनेक धमाल आणि कमाल चित्रपट देणारे मराठमोळे दिग्दर्शक संजय जाधव एक कुल डिरेक्टर म्हणून ओळखले जातात. संजय जाधव हे मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत नावाजलेले व्यक्तिमत्व असून येत्या काळात ते आणखी एक नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहेत. ते सोशल मीडियावर बरेच सक्रिय असल्यामुळे विविध व्हिडीओ किंवा पोस्ट शेअर करत याबाबत माहिती देत असतात. संजय जाधव यांचा असाच एक सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ त्यांना बरोबर ट्रोलर्सच्या निशाण्यावर घेऊन आला आहे.
सध्या संजय जाधव आपल्या नव्या चित्रपटाच्या शूटिंग सेटवर व्यस्त असतात. असे असतानाही ते आपल्या कलाकार मंडळींसोबत एक कॉमिक सिरीज घेऊन आले आहेत. दरम्यान त्यांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण या व्हिडिओतील कॉमेडीने जेव्हढं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं नाही तेव्हढं लक्ष संजय जाधव यांच्या हिंदी बोलण्याने वेधलं आहे. आपण अनेकदा पाहिले असेल कि, संजय जाधव यांच्या चित्रपटात हिंदी भाषेचा सर्रास उपयोग केला जातो. यात काही वावगे नसले तरीही मराठी चित्रपटात हिंदीचा किती प्रयोग करावा..? याचं गणित जाधवांना अजून जमलेलं नाही. इतकंच काय तर शूटिंग सेटवरदेखील ते हिंदी भाषेचा वापर करतात. अगदी मराठी कलाकारासोबत संवाद साधताना सुद्धा हिंदी भाषेचा अट्टाहास का..? असा प्रश्न नेटकऱ्यांना अनेकदा पडला आहे आणि याच प्रश्नाचे रूपांतर आता ट्रोलिंगमध्ये झाले आहे.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिनेता कुशल बद्रीकेसोबत दिग्दर्शक संजय जाधव शूट करताना दिसत आहेत. दरम्यान हे तिघेही मराठी आहेत आणि तरीही जाधवांची हिंदी थांबायचं काही नाव घेत नाहीये. हे पाहून ट्रोलर्सने संजय जाधवांची शाळा भरवली आहे. या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘संजय जाधवांची हिंदी बोलायची खाज कधी मिटणार देव जाणे’. आणखी एकाने म्हटले, ‘मराठी माणसाची मराठी माणसासोबत विनाकारण हिंदी बोलण्याची घाणेरडी सवय कधी बदलेल देव जाणे! हा संजय जाधव तर नेहेमीच विनाकारण कुल वाटावे म्हणून हिंदीत बोलतो, तुम्हा सर्व मराठी कलाकारांकडे बघून वाटते भाषिक स्वाभिमान तुमच्यात आहे की नाही?? काहीतरी दाक्षिणात्य कलाकारांकडून शिका रे! तुमच्यावर मराठी चित्रपट सृष्टी पुढे नेण्याची जबाबदारी आहे, पण हे असले वागणे बघून वाटते तुमची लायकी हिंदी चित्रपटात कामवाली बाई व नोकर ह्याचीच आहे! आता तरी सुधरा!’
Discussion about this post