हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुतच राज्यात पावसाळा सरण्याचे संकेत दिसताना हिवाळ्याची चाहूल लागतेय. पण हिवाळ्याची चाहूल थोडी चटके देणारी भासतेय. याचे कारण म्हणजे ऑक्टोबर हिट. ऑक्टोबरचं वातावरण म्हणजे सकाळी एकदम अंगाची लाही करणारं कडक ऊन आणि संध्याकाळी ओलेचिंब करणारा धुवाँधार पाऊस. या कडक उन्हात शरीराला थंडावा म्हणून जो तो लिंबू सरबत पिणे सोयीस्कर समजतो. पण आता लिंबू सरबत न परवडणारे झाले तर काय करायचे? असेच काहीसे घडले मराठमोळे दिग्दर्शक विजू माने आणि अभिनेता कुशल बद्रीकेसोबत. भर दुपारी लिंबू सरबत प्यायल्यावर त्यांच्यासमोर आलेल्या बिलाचा आकडा पाहून त्याच्या भुवया उंचावल्याच पण त्यांनी केलेली पोस्ट पाहिल्यानंतर सर्वसामान्यांनाही प्रश्न पडला कि आता लिंबू सरबत प्यायचं का नाही?
दिग्दर्शक विजू माने त्यांचा मित्र कुशल बद्रिकेसोबत ठाण्यातील एका हॉटेलमध्ये लिंबू सरबत प्यायला गेले होते. यानंतर साहजिकच बिल आलं आणि हे बिल पाहिल्यानंतर मात्र त्यांचे डोळेच पांढरे झाले. कारण २ ग्लास लिंबू सरबतासाठी ३२५ रुपये बिल भरणं हे काही त्यांच्या खिशाला परवडलं नाही. त्यामुळे लिंबू सरबतापेक्षा बिअर स्वस्त आहे, असा मारक टोला लगावत त्यांनी हा प्रसंग आपल्या चाहत्यांसह अनुभव म्हणून शेअर केला आहे. विजू यांनी ही घटना त्यांच्या अधिकृत फेसबुक हँडलवर पोस्ट प्रदर्शित करीत शेअर केली आहे. यात विजू यांनी लिहिलं कि, ‘मी कुशलला म्हणालो, दुपारी उन्हाचे चटके लागत आहेत म्हणून मस्त बीयर मारुया. तो म्हणाला, नको त्यापेक्षा आपण लिंबू पाणी पिऊ. म्हणून आम्ही लिंबू पाणी प्यायलो आणि लक्षात आलं त्यापेक्षा बिअर स्वस्त आहे आता उन्हाचे चटके मनाला लागत आहेत. ( हे गोव्यात नव्हे ठाण्यात आहे)…’
एकंदर काय तर? हॉटेलमध्ये लिंबू सरबत पिणं विजू यांना भलतंच महागात पडलं आहे. मुख्य म्हणजे हा लिंबू सरबताचा प्लॅन कुशलचा होता. त्यामुळे या पोस्टवर एकापेक्षा एक भन्नाट कमेंट येत आहेत. विजू यांनी हि पोस्ट शेअर करताना बिलाचा फोटो आणि या कांडमागील सूत्रधाराचाही फोटो शेअर केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना कवी सौमित्र यांनी लिहिले कि, हिमालय हॉस्पिटॅलिटी नावाच्या रेस्टोरंट मध्ये जाऊन बिअर किंवा लिंब पाणी हे अनैतिकच आहे .. हिमालय आणि रम .. बघ माझी आ… इतकंच काय तर कुशलची इतक्या लोकांनी चेष्टा केली त्याने कमेंटमध्ये, माझी क्षमा मागून झाली आहे असेही लिहिले आहे. याशिवाय नेटकऱ्यांनीही चांगलीच मजा घेतली आहे. एका युझरने लिहिलं, ‘उन्हाळा चांगलाच चटका लावून गेला.’ तर दुसऱ्या युझरने लिहिलं, ‘आता हे लिंबू लोन उतरवणार कोन?’
Discussion about this post