हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नवाझुद्दीन सिद्दीकी यांचा ‘हड्डी’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाचं मोशन पोस्टर, फर्स्ट लूक आणि अलीकडेच व्हायरल झालेल्या फोटोंमुळे चित्रपटाबाबत असणारी उत्सुकता आणखीच वाढली आहे.
या चित्रपटात नवाझुद्दीन एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर एक आनंदाची बातमी म्हणजे नवाझुद्दीनसोबत पहिली ट्रान्सजेंडर मराठी अभिनेत्री गंगा देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
अलीकडेच व्हायरल झालेल्या फोटोमध्ये नवाझुद्दीन हिरव्या रंगाची साडी, माथ्यावर लाल बिंदी, मोकळे केस आणि डार्क शेडची लिपस्टिक अशा कमाल लूकमध्ये दिसला होता. यामध्ये त्याच्यासोबत आजूबाजूला अन्य ट्रान्सजेंडर दिसत आहेत. ज्यामध्ये गंगाचादेखील समावेश आहे. या चित्रपटात नवाझुद्दीनसोबत तब्बल ८० ट्रान्सजेंडर्सने काम केलं आहे. यामध्ये गंगाचा चेहरा प्रेक्षकांसाठी ओळखीचा आहे. या पोस्टरमध्ये नवाजुद्दीनच्या शेजारी दिसणारी गंगा स्वतःच्या हिंमतीवर आज सिने सृष्टीत अवतरली आहे.
याआधी गंगाने मराठी इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने काही मराठी मालिकांमध्ये काम केले असून ‘कारभारी लयभारी’ या मालिकेत तिने महत्वाची भूमिका साकारली होती. शिवाय झी युवावरील ‘युवा डान्सिंग क्वीन’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही तिने केले होते. यानंतर आता गंगा आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती नवाजुद्दीनसोबत ‘हड्डी’ चित्रपटात स्क्रीन शेअर करते आहे.
गंगा तिच्या अभिनयासोबत प्रेमळ स्वभावासाठी फार लोकप्रिय आहे. यामुळे तिचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. अक्षत अजय शर्मा दिग्दर्शित हड्डी’ सिनेमात गंगाचं असणं अतिशय कौतुकास्पद बाब असून तिचे चाहते तिला या चित्रपटात पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.
Discussion about this post