हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिनेसृष्टीत अमूल्य योगदान देणाऱ्या पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांना दरवर्षी मानांकित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाते. याप्रमाणे यंदाचा ६८’वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा नुकताच दिल्ली येथे संपन्न झाला. यावेळी ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ हा पुरस्कार ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाला प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन दिग्दर्शक शंतनू रोडे आणि प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर करण्यात आली. येत्या २ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर भावना व्यक्त करताना प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले कि, ‘चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी ही आनंदाची बाब आहे आणि हा पुरस्कार केवळ माझ्या एकट्याचा नसून संपूर्ण टीमचा आहे. खूप सुंदर आणि मनाला स्पर्शून जाणारी ही कथा आहे. या कथेला मध्यमवर्गीय स्वप्नांच्या वास्तवाची किनार आहे. म्हणूनच हा चित्रपट प्रेक्षकांना खूप जवळचा वाटणारा आहे. प्लॅनेट मराठीने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबतच त्यांना सर्वोत्कृष्ट आशय देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचेच हे फळ आहे.’
अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स आणि लेकसाईड प्रॅाडक्शन प्रस्तुत ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट येत्या २ डिसेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल अशी निर्मात्यांना खात्री आहे. ‘प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स सोबतच लेकसाइड प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. शिवाय शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी, मृणाल कुलकर्णी या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
Discussion about this post