हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एखादा विषय मिळाला कि तो चघळून चघळून चोथा होईपर्यंत संपवणे म्हणजे काय..? गॉसिप.. सभ्य भाषेत याला चर्चा असे म्हणतात. काय मग आज तुमच्याकडे काय विषय..? शेजारी शेजारी असतील तर त्यांना काहीही चालत. एखादा ग्रुप कट्ट्यावर बसला तर येणारा जाणारा माणूस सुद्धा चर्चेचा सहज विषय होतो. आता आस्ताद काळे, अदिती सारंगधर आणि क्षितिज झारापकर यांचंच पहा ना! ते हि एका चर्चेचा भाग आहेत. होय. म्हणूनच.. ‘चर्चा तर होणारच!’ खूप गोल गोल न फिरवत थेट मुद्द्यावर यायचं म्हटलं तर हे त्रिकुट आपल्या भेटीला एका नाटकाच्या माध्यमातून येतंय आणि म्हणून त्यांची चर्चा आहे.
येत्या १९ नोव्हेंबर २०२२ रोजी हे त्रिकुट ‘चर्चा तर होणारच!’ या नव्या कोऱ्या नाटकाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येत आहे. येत्या शनिवारी अर्थात १९ नोव्हेंबर २०२२ रोजी या नाटकाचा शुभारंभ प्रयोग आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि, कुठे..? तर याचं उत्तर आहे. पुणे, बालगंधर्व येथे सायंकाळी बरोबर ५ वाजता. काय मग रसिक मंडळी सज्ज आहात ना! पुणेकरांचे मनोरंजन केल्यानंतर हे नाटक थेट ठाणेकरांच्या भेटीसाठी जाणार आहे. येत्या २० नोव्हेंबर २०२२ रोजी, रविवारी, रात्री ८.३० वाजता ठाणे, गडकरी रंगायतन येथे या नाटकाचा दुसरा प्रयोग सादर होईल.
रंगनील व वेद प्रॉडक्शन्स निर्मित आणि आर्या व्हिजन प्रस्तुत हे नवं नाटकं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्याच्या हेतूपायी रंगभूमीवर येत आहे. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंत एदलाबादकर यांनी केले आहे. तर कल्पना कोठारी आणि विनय अलगेरी या नाटकाचे निर्माते आहेत. नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे तर प्रकाशयोजना अमोघ फडके यांची आहे. संगीत राहुल रानडे यांचे आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. हे नाटक विनोदी ढंगाने सामजिक विषयावर थेट भाष्य करणार आहे. प्रपोझल या नाटकानंतर आदिती सारंगधर आणि आस्ताद काळे ही जोडी तब्बल ७ वर्षाने या नाटकाद्वारे रंगभूमीवर एकत्र येत आहे. त्यामुळे चर्चा तर होणारच! या नाटकाविषयी त्यांच्या चाहत्यांमध्ये एक विशेष उत्सुकता दिसून येत आहे. नाटकाच्या शुभारंभासाठी त्यांचे चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत.
Discussion about this post