हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रंगदेवता आणि नाट्य रसिकांना अभिवादन करून.. सविनय सादर करत आहोत… आणि नंतर ३ बेल. हि परंपरा दीडशे वर्षांहून देखील अतिशय जुनी आहे. हि परंपरा अविरत प्रवास आहे. ज्यामध्ये कित्येक रंगकर्मी प्रवासी आहेत. ती आरोळी आणि त्या ३ बेल म्हणजे रंगकर्मीचं संपूर्ण आयुष्य. या रंगभूमीचा इतिहास प्रचंड मोठा आहे. नाटक आणि नाटकात काम करणारा कलाकार तसेच पडद्यामागे काम करणारे कलाकार एखादी कलाकृती केवळ सादर करीत नाहीत. तर ती कलाकृती ते अनुभवत असतात. प्रत्येक पात्र अंगी कारून.. चेहऱ्यावर रंग पोतुन प्रेक्षकांना हवा असणारा तो.. तो म्हणजे कोण..? तर तो म्हणजे ‘रंगकर्मी’ देणे आणि प्रेक्षकांची दाद मिळवणे हा अतिशय विलक्षण क्षण असतो. हे तोच समजू शकतो जो सच्चा रंगकर्मी आहे.
सन १८४३ साली रसिक प्रेक्षक मायबापांनी नाटक या विभागाला एक मानाचे स्थान दिले. रंगकर्मींचा नाट्यकलेला टाळी देऊन कौतुकाची थाप दिली आणि सुरु झाला नाट्य परंपरेचा अध्याय. रंगभूमीवर सादर होणारे नाट्य तेव्हा खुलते जेव्हा कलाकाराच्या डोळ्यात प्रेक्षकांना त्या भूमिकेची भावना दिसते आणि तेव्हा येणारी ती शिट्टी, ती टाळी आणि वाह हि दाद एखाद्या पुरस्काराहून बहुमूल्य ठरते. आज दिनांक ५ नोव्हेंबर आणि आजचा हा दिवस प्रत्येक रंगकर्मीसाठी प्रचंड मोठा आहे. कारण आजचा हा दिवस गेल्या अनेक वर्षांपासून ‘मराठी रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जात आहे.
सीता स्वयंवर या नाटकाने सुरु केलेला अध्याय असाच सुरु आहे. अनेक संगीत नाट्य, बालनाट्य, लघु नाट्य सादर करीत प्रेक्षकांसह कलाकारांनी रंगभूमी जगवली. केवळ जगवली नाही तर गाजवलीसुद्धा. संगीत शारदा, संगीत सौभद्र, ती फुलराणी, सखाराम बाईंडर ते दादा एक गुड न्यूज आहे, साखर खाल्लेला माणूस, अलबत्या गलबत्या, एका लग्नाची तिसरी गोष्ट, गाढवाचं लग्न आणि बरेच नाट्यप्रयोग आजही गाजताना दिसत आहेत.
रंगकर्मींनी प्रेक्षकांचे मनोरंजन कधीच थांबू दिले नाही आणि प्रेक्षकांनी कधीच रंगभूमीची साथ सोडली नाही. सन १८४३ मध्ये सांगलीत मराठी रंगभूमीचा पाया रचला तो चिंतामणराव पटवर्धन यांच्या आश्रयात विष्णुदास भावे यांनी.. दिनांक ०५ नोव्हेंबर १८४३ साली ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा प्रयोग झाला आणि रंगभूमी गहिवरली. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापन करण्यात आली आणि सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगलीत ठराव संमती घेऊन हा दिवस ‘मराठी रंगभूमी दिन’ म्हणून घोषित केला गेला.
आजही या दिवसाची साक्ष ५ नोव्हेंबर हि तारीख देते आणि म्हणूनच जगभरात आजचा दिवस ‘मराठी रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. रंगभूमीचा हा प्रवास असाच अविरत सुरु राहो अशी नटवरास प्रार्थना करू आणि रंगभूमीला नमन करून सदाबहार नाटकांचा आस्वाद घेत राहू.
Discussion about this post