हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोकप्रिय मराठी वाहिनी स्टार प्रवाहवरील अत्यंत प्रसिद्ध आणि टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असणारी मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट्स नेहमीच प्रेक्षकांना आवडत असतात. यावेळी मात्र मालिकेतील ट्विस्ट हा अतिशय भावनिक आहे. अलीकडेच गौरी आणि जयदीप हे आई बाबा होणार असल्याचा आनंद साजरा करताना दाखविले होते.
मात्र त्यांच्या पदरातील सुख काही थांबायचे नाव घेईन. त्यांच्या सुखाला कुणाचीतरी दृष्ट लागली आणि गौरीचा अपघात झाला. त्यामुळे गौरी आणि बाळ दोघेही मृत्यूच्या दारात आहेत. त्यांचा जीव वाचावा दोघेही सुखरूप परतावे यासाठी जयदीप थेट कोल्हापूरच्या अंबाबाईला साकडं घालताना दिसणार आहे.
सध्या या मालिकेतील हा ट्विस्ट सगळ्यांसाठीच फार भावनिक ठरला आहे. एकीकडे गौरी आणि तिचं बाळ मृत्यूच्या अगदी जवळ आहे. तर दुसरीकडे जयदीप त्यांचा जीव वाचावा म्हणून स्वतः जीव द्यायलाही तयार आहे. एक आईच आपल्या बाळाचं दुःख समजू शकते म्हणून नवरात्रीच्या पावन प्रसंगी या मालिकेत कोल्हापूरच्या अंबाबाई मातेचे दर्शन सगळ्यांना घडणार आहे. आपल्या पत्नीचा आणि बाळाचा जीव वाचवण्यासाठी जयदीप करवीरनिवासिनी आई अंबाबाईला साकडं घालणार आहे. यावेळी त्याने देवीची शक्य ती सर्व सेवा केली आहे.
यामध्ये जयदीपने गौरीसाठी लोटांगण घातले आणि देवीचे दर्शन घेतले. यासोबतच त्याने मंदिराची साफसफाई करुन दिव्यांची आरासही केली. स्वच्छता आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांची पादत्राणे सांभाळण्याचं कामदेखील त्याने केले. या विशेष भागाचं वेगळेपण म्हणजे देवीच्या रुपात अभिनेत्री निशा परुळेकर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
याआधी दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेतही तिने देवी अंबाबाई साकारली होती. आता जयदीपची ही खडतर तपश्चर्या पूर्ण होईल का..? गौरी आणि तिचं बाळ सुखरुप घरी परतणार का..? हे पाहणे अत्यंत उत्कंठता वाढविणारे आहे.
दरम्यान या भागाचे चित्रीकरण सुरु असताना हजारोंच्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली होती. प्रेक्षकांचे हे प्रेमच नवी ऊर्जा देते अशी भावना जयदीप हि व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता मंदार जाधवने व्यक्त केली. शिवाय शूटिंगच्या निमित्ताने का होईना देवीची सेवा करायला मिळाली ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे असंही तो म्हणाला.
Discussion about this post