हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसचं घर म्हटलं कि राडे होणार यात काही नवीन नाही. पण बिग बॉस १६ च्या घरात रोजच काही ना काही होत असतं. या घरात आतापर्यंत आपण अनेक भांडण पाहिली. ज्यामध्ये बाचाबाचीने हाणामारीचे स्वरूप घेतले. घरातील अर्धी अधिक भांडणं तर अर्चना गौतमच्या लावण्याने झाल्याचेही आपण पाहिले. स्वतः अर्चनासुद्धा अगदी त्रागा करून अनेकदा भांडताना दिसली. अशातच आता अर्चना आणि विकासामध्ये असं काही भांडण झालंय कि यामध्ये दोघांनीही हद्द पार केली म्हणायची वेळ आली आहे. त्यांची एक चूक सगळ्यांनाच भारी पडू शकत होती.
कलर्स टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका प्रोमोमध्ये या भांडणाची एक झलक आपण पाहू शकता. किचनमध्ये अर्चना जेवण बनवत असताना तिथे विकास येतो आणि चहा बनवू लागतो. हे पाहून अर्चनाला तिचा राग अनावर होतो आणि ती इथे चहा बनणार नाही तिकडे बनव असे सांगताना दिसली. पण विकासला मात्र त्याच बर्नरवर चहा उकळायचा होता जिथे अर्चना जेवण बनवत होती. यामुळे अर्चनाने चहाचं भांड उचललं आणि या दरम्यान विकासने तिचा हातधरण्याचा प्रयत्न केल्यामुळे गरम पाणी त्याच्या अंगावर उडालं. यावेळी किचनमध्ये अर्चनाच्या मागे उभ्या असलेल्या प्रियांकाच्या अंगावरही गरम पाणी उडालं. त्यामुळे प्रियंकानं अर्चनाला तू वेडी आहेस का..? काहीही काय करतेस..? असा सवाल केला.
हे सगळं एव्हढ्यावर हे थांबलं नाही तर उडालेलं गरम पाणी तेलात उडालं आणि यामुळे तेल तडतडून उडू लागलं. या सर्व प्रकारात कुणालाही मोठी आणि गंभीर इजा होऊ शकत होती. त्यामुळे हा व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी अर्चनावर ताशेरे ओढले आहेत. याआधी देखील अर्चनाने शिव ठाकरेचा गळा पकडला होता. पण तिला पुन्हा एकदा घरात स्पर्धक म्हणून सहभागी करून घेतले. यानंतर आता पुन्हा बाचाबाची आणि अनावर झालेला राग कुणाला तरी इजा पोहोचण्याचे कारण होऊ शकत होता. त्यामुळे नेटकऱ्यांनी यावेळी अर्चनाला शिक्षा झालीच पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. या प्रकारावर आता बिग बॉस काय निर्णय घेतात हे महत्वाचे ठरणार आहे.
Discussion about this post