हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बहुप्रतीक्षित ‘मी वसंतराव’ या संगीतमय अनुभूती देणाऱ्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सर्वत्र प्रदर्शित झाला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक विलक्षण अनुभव भेटीला घेऊन येत आहे. हा चित्रपट म्हणजे समृद्ध करणारा एक आगळा वेगळा अनुभव आहे, अशी भावना गायक आणि वसंतरावांची भूमिका साकारणारे राहुल देशपांडे यांनी व्यक्त केली. राहुल देशपांडे हे स्वतः पंडित वसंतराव देशपांडे यांचे नातू आहेत.
‘मी वसंतराव’ या संगीतमय मराठी चित्रपटाचा ट्रेलर सोहळा सोमवारी मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्री गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, राहुल देशपांडे, अनिता दाते, सारंग साठये, कौमुदी वालोकर, अमेय वाघ, सुबोध भावे, हृषिकेश जोशी, जितेंद्र जोशी आदी कलाकार उपस्थित होते.
या चित्रपटाबद्दल बोलताना राहुल देशपांडे म्हणाले की, स्वतःचा जितका चोहोबाजूने शोध घेऊ तितकं आपण समृद्ध होतो. याचा अनुभव मला ‘मी वसंतराव’ करताना आला. या प्रवासात एक कलाकार आणि मुख्य म्हणजे एक व्यक्ती म्हणून मी वृद्धिंगत झालो. नाना पाटेकर म्हणाले, वसंतरावांना भावगीत, ठुमरी, नाटय़गीत, गझल, लावणी अशा सगळ्याच प्रकारची गायकी यायची. गायकी त्यांच्या नसनसात भिनलेली होती. त्यांचा साहित्याचा अभ्यासही अफाट होता. मी वसंतरावांना भेटलो आहे. त्यांच्या सान्निध्यात आल्याने एक व्यक्ती म्हणून मला त्यांना जवळून अनुभवता आले.
Discussion about this post