हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर आगामी मराठी चित्रपट ‘तमाशा लाईव्ह’ हा चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या १५ जुलै २०२२ रोजी सर्वत्र सिनेमा गृहात प्रदर्शित होत आहे. याआधी चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना नाद लावला आहे. अलीकडेच चित्रपटातील जल्लोषमयी गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे बोल ‘वाघ आला’ असे असून हे एक रॅप साँग आहे. यांनतर आता चित्रपटातून आणखी एक भन्नाट गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे शीर्षक मेल्याहून मेल्यागत असे आहे आणि या गाण्याचा गायक स्वतः सिद्धार्थ जाधव आहे.
‘होतास ना खंबीर, मग WHY SO गंभीर’ असे या गाण्याचे लक्षवेधी बोल आहेत. ‘मेल्याहून मेल्यागात’ या गाण्याला गीतकार क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे. तर पंकज पडघन यांनी संगीत दिले आहे. या गाण्यातून सिद्धार्थ विविध लूकमध्ये दिसतो. एखादे सत्य शोधण्यासाठीची त्याची धडपड या गाण्यातून दिसत आहे. हे संपूर्ण गाणे सिद्धार्थवरच चित्रित करण्यात आले आहे.
अक्षय बर्दापूरकर निर्मित, संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक सांगितिक नजराणा आहे. सगळ्यात आधी नांदी, मग प्रेमगीत, त्यानंतर जल्लोषगीत आणि आता ‘मेल्याहून मेल्यागत’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे.
या चित्रपटाची कथा या चित्रपटातील गाण्यांच्या माध्यमातून पुढे येतेय. त्यामुळे या कथानकाला साजेसे आणि दमदार संगीत देण्यात आले आहे. याविषयी बोलताना संगीतकार पंकज पडघन यांनी सांगितले कि, प्रत्येक गाण्यात आम्ही काही प्रयोग केले आहेत. या गाण्याच्या निमित्ताने सिद्धार्थ प्रथमच गाणे गायला आहे. त्यासाठी त्याने विशेष मेहनत घेतली आहे. इतर गाण्याप्रमाणे हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. याशिवाय प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले कि, ‘संगीताच्या माध्यमातून व्यक्तिरेखेची ओळख होणे, कथा पुढे जाणे ही संकल्पनाच खूप अनोखी आहे आणि प्रत्येक गाण्यात काहीतरी नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याचा संजय जाधव यांचा प्रयत्न नक्कीच स्वागतार्ह आहे. यात त्यांना संगीत टीम उत्कृष्ट लाभल्याने या सगळ्याच गाण्यांना चारचाँद लागले आहेत. काहीतरी गूढ उलगडणारे हे गाणे अतिशय श्रवणीय आहे.’
Discussion about this post