हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. नेहमीच ते आपल्या कामाविषयी, अनुभवाविषयी, भूमिकेविषयी बोलताना दिसतात. त्यांची प्रत्येक पोस्ट काहीतरी शिकवण घेऊन येते. आयुष्यातील बारकावे सांगणाऱ्या विविध पोस्ट शेअर करणारे मिलिंद आज थोडे भावुक झाले आहेत. कारण आज मिलिंद यांच्या आईंना जाऊन चौदा वर्ष झाली आहेत. आई नसणे हि भावना किती वेदनादायी असते हे सांगणारी बोलकी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. सोबत आईचे आणि आईसोबतचे काही फोटो शेअर करत त्यांनी आठवणींना उजाळा दिला आहे. आपली आई कशी होती हे सांगणारी त्यांची हि पोस्ट नेटकऱ्यांच्या मनाला भावली आहे.
मिलिंद यांनी या लिहिलंय कि, ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी… आज चौदा वर्ष पूर्ण झाली माझ्या आईला जाऊन. २ मार्च २००९ संध्याकाळी ६ वाजता माझ्या आईची गुरु, गुरुमाई चित्विलासानंद यांचा जप करत करत ती निघून गेली. अफाट श्रद्धा आणि प्रेम, श्रद्धा आणि सबुरी हे तिचं ब्रीदवाक्य होतं. असीम प्रेम, सतत इतरांची सेवा, आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करत राहणे, कोणालाही कधीही दुखवू नये, लोकांची मनं सांभाळावी, भुकेलेला दोन घास खाऊ घालावे, मग तो मग तो कोणीही असो.. मालक असो ड्रायव्हर असो राजा रंक असो, नातेवाईक असो ओळखीचा असो किंवा अनोळखी असो, अतिथी देवो भव, स्वतःआधी दुसऱ्याचा विचार करावा, प्रेमाशिवाय जगामध्ये दुसरं काहीही महत्त्वाचं नाही.
असंख्य उपवास, पूजा पाठ, देवदर्शन, शिर्डीच्या साईबाबांनी नवसाने मुलगा दिला, मुंबईच्या महालक्ष्मीने मुंबईत राहायला घर दिलं, शेगावच्या गजानन महाराजांनी मुलाचे शिक्षण पूर्ण केलं, वैष्णव देवीने नवऱ्याला नोकरीत यश दिलं, तिच्या प्रेमाच्या माणसांना जे काय हवं असेल ते ती परमेश्वराकडन मागून घ्यायची आणि त्याला द्यावं लागायचं, त्याला नवस बोलायची आणि तो नवस ती आवर्जून फेडायची. संतोषी मातेचे व्रत असो, नवरात्रीचे नऊ दिवस उपवास असो, गुरूवारचा साईबाबांचा उपवास तर आहे, सोमवारी शंकराचा उपवास, शनिवारी शनीचा उपवास, बुधवारी माहीम चर्चला जायचं, मदर मेरीशी सुद्धा तिची मैत्री होती, शुक्रवारी माहीमच्या मगदूम बाबाच्या दर्ग्यात जायचं, ती अशी होती की अल्ला सुद्धा तिचं सगळं ऐकायचे.
माझी बहीण संगीता तिची दहावीची परीक्षा, दुसऱ्या दिवशी कुठल्यातरी विषयाचा पेपर होता आणि घरी पाहुणे आले. आई माझ्या बहिणीला म्हणाली, अग काळजी करू नको मार्क काय तुला माझे परमेश्वर भरपूर देईल. अभ्यास सोड आणि मला स्वयंपाकात मदत करायला ये आणि निकाल लागला तर ती चांगल्या मार्काने पासही झाली होती. खरच माझं पोस्ट ग्रॅज्युएशन तर तिच्या परमेश्वरा मुळेच पूर्ण झालंय. नाहीतर शिक्षणाचा आणि माझा ३६चा आकडा होता. तिच्या आशीर्वादाशिवाय आयुष्यात काहीही घडत नव्हतं आणि अजून ही नाही. ती जाऊन इतकी वर्ष झाली तरी सुद्धा ती आहे. आपल्या जवळच आहे आपल्याला ती कधी सोडून गेलेलीच नाही अशी सतत जाणीव असते. मला तर खात्रीच वाटते, की आई आता कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवी बरोबर गप्पा मारत बसली असेल, तुळजापूरच्या भवानी मातेची सेवा करत बसली असेल किंवा शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात किंवा मग सिद्धिविनायकाला मोगऱ्याचे गजरे करून देत असेल आणि ते करत असताना त्यांना आपल्या लेकरांना आपल्या माणसांना सुखी ठेव हेही सांगत असेल. मातृ देवो भव!!’
अशी डोळ्यात पाणी आणणारी भावनिक पोस्ट मिलिंद गवळी यांनी शेअर केली आहे. हि पोस्ट वाचल्यावर क्षणातच आईविना येणाऱ्या पोरकेपणाची जाणीव काळजात चर्रर्र करून जाते. भले आज मिलिंद यांची आई हयात नसेल पण तिच्या सोबत असण्याचा भास कायम त्यांच्यासोबत आहे. आईचे आशीर्वाद जगातील कोणत्याही आशिर्वादापेक्षा मोठे असतात हेच खरं. आज मिलिंद गवळी लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत आहेत आणि हे पाहून त्यांची आई गर्वाने हा माझा लेक आहे म्हणत असतील यात काहीच शंका नाही.
Discussion about this post