हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठी ३ च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या घराघरात आणि त्यांच्या मनामनांत पोहोचलेली मीरा जगन्नाथ सध्या एका विचित्र परिस्थितीतून जात आहे. सोशल मीडियावर तिच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह, खोट्या आणि घाणेरड्या पद्धतीच्या अफवा पसरविल्या जात आहेत. ज्यामुळे तिला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रकरणी मीराने थेट मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली असून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. याबाबत तिने तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त करत अशा लोकांना अद्दल घडवा अशी विनंती मुंबई पोलिसांना केली आहे.
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वानंतर मीरा जगन्नाथ वारंवार तिच्या हटके स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. मात्र गेल्या काही काळात सोशल मीडियावर मीराविषयी घाणेरड्या अफवा पसरविल्या जात आहेत. हि बाब तिच्या निदर्शनास येताच तिने आक्रमक भूमिका घेतली आहे. सगळ्यात आधी तिने याबाबत मुंबई पोलीस आणि सायबर सेल यांना माहिती दिली आहे. ज्यामुळे या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. यानंतर सोशल मीडियावर याबाबत माहिती देत तिने आपल्या अकाऊंटवरून कुणालाही आक्षेपार्ह मेसेज किंवा पोस्ट दिसल्यास ते अकाउंट ब्लॉक वा रिपोर्ट करण्याचे आवाहन केले आहे.
हि इंस्टा स्टोरी शेअर करताना तिने लिहिले आहे कि, ‘सोशल मीडियावर एखाद्या विषयी घाणेरड्या अफवा पसरवून त्यांच्या विषयी लोकांना चुकीची माहिती देणे आणि पर्यायाने त्यांची मानहानी करणे हा कायद्याने शिक्षेस पात्र गुन्हा आहे. जो काही समाजकंटक आत्ता माझ्या विरुद्ध करत आहेत. आपल्याला जर अशा पद्धतीचे काही मेसेज किंवा पोस्ट दिसल्या तर कृपया अकाऊंट रिपोर्ट किंवा ब्लॉक करा. अफवांवर विश्वास ठेवू नका. मुंबई पोलीस आणि सायबर पोलीस ह्यांच्या कार्य क्षमतेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि लवकरच गुन्हेगार पकडले जातील.’ मीराची हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि तिच्या चाहत्यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदविला आहे.
Discussion about this post