हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अगदी काहीच दिवसांपूर्वी मनोरंजन क्षेत्रात एका अभिनेत्रीला कामाचे आमिष दाखवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या तब्बल ४ जणांना मनसे स्टाईलने चांगलाच धडा दिला आहे. दरम्यान मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुकवर लाईव्ह करत या प्रकरणाची सर्वाना माहिती दिली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अगदी बुद्द्धीनिशी एक सापळा रचला आणि ठाण्याचा घोडबंदर रोडवरील फार्म हाऊसवर संबंधित निर्मात्यांना घेरले आणि त्यानंतर त्यांना मनसे स्टाईल दाखविली अर्थात आयुष्यभर लक्षात राहील असा चांगलाच चोप दिला आणि त्या अभिनेत्रीची सुटका केली. या व्हिडिओत आपण पाहू शकता कि मनसे चित्रपट कर्मचारी सेना उपाध्यक्ष पद्मनाभ राणे यांनी या निर्मात्यांना कश्या पदधतीने दणका दिला आहे.
याबाबत मनसे चित्रपट कर्मचारी सेने अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुक लाइव्हवर येत सांगितले की, ”आज सकाळी आमच्या मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद्मनाभ राणे यांना एका अभिनेत्रीने फोन केला. तिला काल एका कास्टिंग डिरेक्टरने फोन केला होता. तुला एका हिंदी चित्रपटात कास्ट केलेले आहे. पण जर तुला मुख्य भूमिका हवी असेल तर उद्या ते निर्माते लखनऊवरुन मुंबईत येणार आहेत. मात्र तुला त्यांना खूश करावे लागेल. तुला कॉम्प्रोमाइज करावे लागेल. तरच तुला त्या मोठ्या चित्रपटात रोल मिळेल.
या प्रकारानंतर त्या मुलीने हिंमत दाखवली आणि तिच्या घरच्यांच्या कानावर सगळा प्रकार घातला. पुढे तिच्या घरच्यांनी मनसे चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्यांना हा सगळा प्रकार सांगितला आणि त्यानंतर आमच्या महिला रणरागिणींनी त्या कास्टिंग डायरेक्टरचा पाठलाग केला. ज्या गाडीत त्या मुलीला कास्टिंग डायरेक्टर घेऊन जात होता त्याला मनसे सैनिकांनी ट्रॅप केले.
ठाणे घोडबंदर येथील एका फार्महाउसवर त्या तरूणीला नेले. तिथे चार निर्माते होते. बिरालाल यादव, राहुल यादव, कंचन यादव, जयजेश यादव अशी त्यांची नावे आहेत. मनसे सैनिकांनी त्यांना चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत आहोत. त्यात एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी देखील आहे. अजून जर कुणाला या लोकांपासून त्रास झाला असेल तर त्यांनी लगेच आम्हाला संपर्क करावा’, असे आवाहन अमेय खोपकर यांनी मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आणि कार्यरत असणाऱ्या महिला आणि काम करू इच्छित असणाऱ्या युवतींना केले आहे.
Discussion about this post