हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेला ‘हर हर महादेव’ हा मराठी ऐतिहासिक चित्रपट चुकीचा इतिहास दाखवतोय अशी बोंब ठोकत अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. ज्यामुळे या मराठी चित्रपटावरून सध्या राजकीय क्षेत्रात आणि महाराष्ट्रातील विविध भागात मोठा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात दाखवलेला इतिहास चुकीचा आहे म्हणत अनेक संघटनांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांविरोधात बंड पुकारत कायदेशीर नोटीसा बजावल्या आहेत. ठिकठिकाणी या चित्रपटाचे शो बंद पाडले गेले. असे असताना मनसे मात्र या चित्रपटाच्या समर्थानात उभी आहे. आज ठाण्यात या चित्रपटाचा मोफत शोदेखील होणार आहे.
सोमवारी जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात या चित्रपटाविरोधात जोरदार आंदोलन केलं आणि थिएटरमध्ये चालू शो बंद पाडला. मात्र, आव्हाड यांनी पाठ फिरवताच मनसेचे ठाणे- पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी हा शो पुन्हा चालू केला. ठाण्यात घडलेल्या घटनेनंतरही आज सायंकाळी मनसे आयोजित ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा मोफत शो दाखवण्यात येणार आहे. यामुळे कदाचित राजकारण अजून तापण्याची शक्यता आहे. आधीच या चित्रपटाविरोधात ज्या संघटनांनी नोटीस पाठवली आहे त्यामध्ये संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र, मराठा सेवा संघ आणि ऑल इंडिया शिवजयंती महोत्सत्व समिती यांचा समावेश आहे. यात अनेक प्रेक्षकांनी देखील आपला संताप दर्शवला आहे.
आज मंगळवार, दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ रोजी, सायंकाळी ठीक ६ वाजून १५ मिनिटांनी विवियाना मॉल, ठाणे पश्चिम येथे ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा मोफत शो मनसेने आयोजित केला आहे. आता या शोसाठी किती प्रेक्षक येणार हा प्रश्न मुळी उरलेलाच नाही. तर या शोमध्ये काय राडा होणार..? यामुळे पुन्हा राजकारण केले जाईल का..? इतिहासाचा वापर गलिच्छ राजकारण करण्यासाठी होतोय का.? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडत आहेत.
Discussion about this post