हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय कॉमिक अभिनेता भरत जाधवचा मोठा चाहता वर्ग आहे. कारण मराठी नाटक, मालिका, सिनेमा अशा विविध माध्यमातून त्याने नेहमीच रसिक प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. गेल्या काही काळापासून भरत हा दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांनी गाजवलेल्या ‘मोरुची मावशी’ या धमाल विनोदी नाटकाचे सत्र पुढे चालवीत आहे. या नाटकात मावशीचे मुख्य आणि विनोदी पात्र साकारून भरतने सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला आहे. आता हाच भरत आणि हीच मावशी परदेशात गोऱ्यांचं मन जिंकायला अमेरिका दौऱ्यावर गेली आहे. आजपासून हा दौरा सुरु झाला आहे तो १३ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे.
मराठी अभिनेता आणि मोरूची मावशीचे पात्र साकारणाऱ्या भरत जाधवने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरून आपल्या चाहत्यांना आणि तमाम रसिक प्रेक्षकांना या दौर्याविषयी माहिती दिली आहे. कारण हा काही साधा दौरा नव्हे. तर हा ‘मोरूची मावशी’ या नाटकाचा विदेश दौरा आहे. म्हणजेच या नाटकाचे काही प्रयोग अमेरिकेत होणार आहेत. याविषयी माहिती देताना भरत जाधवने लिहिले आहे कि, मावशी दाखल झालीये अमेरिकेत..!!! ५ आठवडे, १५ प्रयोग, फुल्ल ऑन टांग टिंग टिंगा..’ यासोबतच त्याने सर्व प्रयोगांचे तपशील दिले आहेत.’ तर दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलंय कि, तमाम मराठी रसिकांना भेटायला… मावशी कांदा संस्थानाहून थेट अमेरिकेत आली….तुम्ही थिएटर वर नक्की या..!! टांग टिंग टिंगा..#मोरूचीमावशीचा अमेरिका दौरा.
आचार्य अत्रे लिखित आणि अत्यंत गाजलेले नाटक ‘मोरूची मावशी’चा पहिला प्रयोग दिनांक १ मे १९६३ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात पार पडला होता. तेव्हा मावशीची भूमिका बापूराव माने यांनी साकारली होती. काही वर्षानंतर हेच नाटक नव्या संचात करताना मावशीच्या भूमिकेसाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांना विचारलं गेलं. पण त्यांनी स्वतः हि भूमिका न साकारत विजय चव्हाण यांचे नाव पुढे केले आणि विजू मामांनी मावशीला प्रेक्षकांच्या मनात रुजवलं. विजू मामा या भूमिकेत जगत होते आणि प्रेक्षकांना जगवत होते. मात्र विजू मामांना देवाज्ञा झाल्यानंतर आता मावशी पोरकी झाली असे वाटू लागले. तोच अभिनेता भरत जाधवने पुन्हा एकदा मावशीमध्ये जीव टाकला आणि या संधीच सोनं करत आज मावशीला अमेरिकेत घेऊन गेले आहेत. तर ‘मोरूची मावशी’ या धमाल विनोदी नाटकाच्या परदेश दौऱ्यासाठी ‘हॅलो बॉलिवूड’ समूहातर्फे हार्दिक शुभेच्छा!
Discussion about this post