हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक १९ फेब्रुवारी असून सर्वत्र शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. सर्वत्र एकच उद्घोष ऐकू येतोय आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कि.. जय! यानंतर आता मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून ‘बाल शिवाजी‘ या चित्रपटाची घोषणा केली आहे. शिवाय येत्या जून २०२२ मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होईल असेही सांगण्यात आले आहे. हा चित्रपट शिवरायांच्या प्रेरणादायी आणि वीर बालपणाच्या कथांवर आधारित असा ऐतिहासिक चित्रपट आहे.
दिग्दर्शक रवी जाधव यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले कि, अंधार गाडून, आभाळ फाडून, मातीचा हुंकार, आलाया! वाघाची संतान, डोळ्यात तुफान, कराया प्रहार, आलाया!!! गेली ८ वर्ष जे स्वप्न उराशी बाळगलं… सादर आहे त्याची ही पहिली झलक. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मंगल दिनी इरॉस इंटरनॅशनल, आनंद पंडीत मोशन पिक्चर्स, रवी जाधव फिल्म्स आणि लिजंड स्टुडिओज सादर करीत आहेत एक भव्य दिव्य मराठी चित्रपट ‘बाल शिवाजी’
View this post on Instagram
‘बाल शिवाजी’ या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले कि, सेल्युलॉइडवर कथन करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी आम्हाला आठ वर्षांचे संशोधन लागले. खरंतर मला २०१५ पासून या विषयावर चित्रपट बनवायचा होता. गेल्या वर्षी निर्माता संदीप सिंग यांची भेट घेऊन मी त्यांना ही कथादेखील सांगितली. ही शौर्यगाथा सांगण्याचे महत्त्व समजून घेतलेल्या संदीपला ही सकारात्मक ऊर्जा प्राप्त झाल्यानंतर अखेर हा चित्रपट आता प्रेक्षकांसाठी सज्ज होण्याच्या तयारीत आहे. हा चित्रपट जगभरातील सर्व तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.”
या चित्रपटाविषयी बोलताना लिजेंड स्टुडिओचे चित्रपट निर्माते संदीप सिंग म्हणाले कि, भारताच्या इतिहासाचे भविष्य घडवणाऱ्या शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या घटनांवर या चित्रपटाची कथा आहे. मला ऐतिहासिक चित्रपट निर्मितीची आवड आहे आणि म्हणून रवीने मांडलेला विषय मला भावला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वावर आधारित चित्रपट बनवणे हा माझा सन्मान आहे.
Discussion about this post