हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबईने उघड्या डोळ्याने पाहिलेला एक थरारक प्रसंग म्हणजे २६/११. हा एक असा दिवस आणि अशी काळरात्र होती जेव्हा संपूर्ण मुंबई नगर थरकापाने बिथरले होते. याच पार्शवभूमीवर अमेझॉन प्राईम व्हिडिओने काल्पनिक वैद्यकीय ड्रामावर आधारीत वेबसीरिज ‘मुंबई डायरीज २६/११’ची निर्मिती केली आहे. या वेबसीरिजच्या ट्रेलरचे अनावरण नुकतेच गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या ‘साहस को सलाम’ या सोहळ्यात करण्यात आले. यात, डॉक्टर्स आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या शौर्य, निष्ठा आणि नि:स्वार्थी बलिदानापस आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अमेझॉन इंडिया ओरिजिनलच्या प्रमुख अपर्णा पुरोहित, दिग्दर्शक निखिल अडवाणी, निर्माते आणि मालिकेतील कलाकार यांच्या उपस्थितीत या नायकांच्या अमूल्य बलिदानाच्या स्मृती जागवणारा ‘साहस को सलाम’ कार्यक्रम साजरा झाला.
अमेझॉन प्राईम व्हिडिओची ‘मुंबई डायरीज २६/११’ ही काल्पनिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कार्यास सलाम करणारी आणि २६/११च्या भीतीदायक, अविस्मरणीय रात्रीला अधोरेखित करणारी वेब सिरीज आहे. या दिवशी एकीकडे अख्ख मुंबई शहर उद्धवस्त झालं तर दुसरीकडे मुंबईकरांची एकजूट दिसली. या संकटाने इतरांना कोणत्याही संकटात मजबुतीने उभा राहण्याचा एक अतूट आत्मविश्वास दिला. ही वेब सिरीज त्याच आत्मविश्वाची कथा मांडताना दिसेल. यात सरकारी रूग्णालयात घडलेले प्रसंग आणि रूग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी तसेच आणीबाणीच्या प्रसंगाला आणि आव्हानांना सामोरे जाणारे हे योद्धा आणि त्यांच्या मनाची चलबिचल स्पष्ट करण्यात आली आहे.
‘मुंबई डायरीज २६/११’ हा शो ०९ सप्टेंबर २०२१ रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे. एमी एंटरनेटमेंटच्या मोनिशा अडवाणी आणि मधू भोजवानी निर्मित निखिल अडवाणी दिग्दर्शित तर निखिल गोन्सालविस सहदिग्दर्शित हि वेब सिरीज असणार आहे. ‘मुंबई डायरीज २६/११’ हि वेब सिरीज डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल आणि रूग्णालय कर्मचारी ज्यांनी २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतावादी हल्ल्यादरम्यान लोकांचे जीव वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या त्या प्रत्येक वैद्यकीय कर्मचाऱ्याची अप्रकाशित कथा सादर करते. यात कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टिना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावडी हे कलाकार दर्जात्मक भूमिका साकारताना दिसणार आहेत.
Discussion about this post