हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रत्येक गणेशोत्सवात आपण ‘चिकमोत्याची माळ’ हे गाणं ऐकत असतो. या गाण्याचे सूर, संगीत, ओळ कानी पडले कि उत्साह संचारतो. गणेशोत्सवात हमखास कानी पडणाऱ्या या गाण्याला मोहक आणि आकर्षक बनविणारे संगीत हे प्रसिध्द संगीतकार निर्मल मुखर्जी यांनी अरविंद हळदीपूर यांच्यासोबतीने दिले होते. आज या प्रसिद्ध वाद्यवादक आणि संगीतकार निर्मल मुखर्जी यांच्या निधनाच्या बातमीने सुरांमधला सा काढून घेतला आहे अशी भावना संगीत सृष्टीतून व्यक्त केली जात आहे.
दिनांक १८ जानेवारी २०२३ रोजी, बुधवारी पहाटे हिरानंदानी रुग्णालयात प्रसिद्ध संगीतकार आणि वाद्य वादक निर्मल मुखर्जी यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान ते ७१ वर्षांचे होते. आजतागायत त्यांनी विविध पाश्चिमात्य वाद्यांवर हुकूमत गाजवली आहे आणि अनेक गाण्यांना संगीतबद्ध केले आहे. निर्मल यांनी वयाच्या दहाव्या वर्षीच वादक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. निर्मल यांचे वडील चित्रपट निर्माते होते. त्यांच्या मालकीचा बसंती म्युझिक हॉल हा मुंबईतील दादर परिसरात होता. या हॉलमध्ये त्या काळातील अनेक सिनेमांच्या गाण्यांचे संगीतकार विविध गाण्याचे ध्वनिमुद्रण करण्यापूर्वी सराव करत असत. याचा प्रभाव निर्माण यांच्या मनावर पडला आणि पुढे एक संगीतकार घडला.
निर्माण यांनी वयाच्या १४ व्या वर्षी सिने म्युझिक असोसिएशनचे सदस्यत्व घेतले आणि वादक म्हणून ओळख मिळवली. हाजरा सिंग यांच्या वाद्यवृंदात बोंगो वाजवण्यापासून ते पुढे लक्ष्मीकांत – प्यारेलाल या प्रसिद्ध जोडीसह त्यांनी संगीत सृष्टी गाजवली. त्यांच्या विशिष्ट वादनामुळे राहुल देव बर्मन, राजेश रोशन, कल्याणजी- आनंदजी, अनू मलिक, जतिन- ललित, विशाल- शेखर अशा लोकप्रिय संगीतकारांकडे ते वादक म्हणून नक्की झाले होते. एखादे वाद्य कसे वाजवावे हे केवळ निरीक्षणातून ते जाणत असत. अशा जाणकार आणि अनुभवी व्यक्तिमत्वाचा संगीत सृष्टीला अखेरचा निरोप हा मोठा धक्का ठरला आहे.
Discussion about this post