हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सर्वत्र ‘गंगूबाई काठियावाड़ी’ या चित्रपटाची चर्चा आहे. याचे कारण म्हणजे कधी शिर्षकावर वाद तर कधी चित्रित दृश्यांवर आक्षेप. यानंतर आता खुद्द गंगुबाईंच्या कुटुंबीयांनीच चित्रपटाला तीव्र विरोध केला आहे. याआधीही त्यांनी चित्रपटाबाबत आपली नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता मात्र थेट कथानकावर बोट ठेवले आहे. गंगुबाईंच्या कुटुंबीयांनी सांगितले कि कथानकात गंगुबाईंची प्रतिमा मलिन करण्यात आली आहे. यामुळे आमचा या कथानकाला आणि संपूर्ण चित्रपटाला तीव्र विरोध आहे.
https://twitter.com/khaki4_service/status/1493813401310547970
येत्या २५ फेब्रुवारी २०२२ रोजी हा चित्रपट थिअटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र संजय लीला भन्साली यांचा इतिहास सांगतो कि, वादाशिवाय चित्रपट रिलीज नाही. त्यामुळे गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट देखील वादात अडकला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच याला सुरुवात झाली आहे. गंगूबाईंच्या कुटुंबीयांनीट्रेलर पाहिल्यानंतर थेट न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान त्यांचे वकिल म्हणाले कि, समाजासाठी झोकून काम करणाऱ्या महिलेला वेश्या म्हणून दाखवलं आहे, असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.
गंगूबाई यांच्या कुटुंबीयांचे वकील म्हणाले की, “जेव्हा गंगूबाईच्या घरच्यांना कळले की, त्यांच्या जीवनावर चित्रपट बनत आहे, तेव्हा ते घर बदलून अंधेरी किंवा बोरिवलीला लपून राहू लागले आहेत. कारण या चित्रपटात गंगूबाईंचे चित्रण ज्याप्रकारे केले आहे, ते पाहून गंगूबाई खरोखरच वेश्या होत्या का समाजसेविका? असा प्रश्न अनेक नातेवाईक विचारत आहेत. यानंतर ट्रेलर रिलीज झाल्यानंतर गंगूबाईंची प्रतिमा ज्या पद्धतीने मांडली आहे ती पाहून आम्ही चक्रावलो. दर्शविलेली प्रतिमा पूर्णपणे चुकीची आणि निराधार आहे. तुम्ही सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या महिलेला वेश्या म्हणून दाखवत आहात, हे कोणत्या कुटुंबाला आवडेल? तुम्ही त्यांना लेडी माफिया डॉन बनवले आहे.”
गंगुबाईंच्या नातीने यावर प्रतिक्रिया देत म्हटले, निर्माते पैशासाठी आमच्या कुटुंबाची बदनामी करत आहेत. याशिवाय चित्रपटासाठी आमची संमती घेतली नाही. त्यांचा दत्तक मुलगा बाबू रावजी शाह यांनीही २०२१ मध्ये चित्रपटाबाबत याचिका दाखल केली होती. या प्रकरणी मुंबईतील न्यायालयाने निर्माते भन्साली आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांना समन्स बजावले होते. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आणि निर्मात्यांविरुद्ध गुन्हेगारी मानहानीच्या कारवाईला स्थगिती दिली होती.
Discussion about this post