हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक नागराज मंजुळे हे अत्यंत प्रतिभावान कलाकृती बनवून नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकत असतात. अलीकडेच त्यांचा ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे वास्तववादी कथानक आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला. आतापर्यंत ‘सैराट’, ‘नाळ’, ‘झुंड’ असे दर्जेदार चित्रपट नागराज मंजुळे यांनी सिनेसृष्टीला दिले आहेत. झुंड हा क्रीडाविषयक चित्रपट होता आणि यानंतर आता ‘खाशाबा’ हा चित्रपट घेऊन मंजुळे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा चित्रपटदेखील क्रीडा कथानकावर आधारित असलेला महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा बायोपिक असणार आहे.
नागराज मंजुळे यांच्या ‘खाशाबा’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झाले असून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या पोस्टरसोबत नागराज मंजुळे यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘ऑलम्पिकच्या इतिहासात भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव गौरवाने नोंदवणाऱ्या अत्यंत प्रतिभावंत पहिलवान खाशाबा जाधवांच्या आयुष्यावर मला चित्रपट करायला मिळतोय ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. फँड्री, सैराट नंतर ‘खाशाबा’ हा माझा तिसरा मराठी चित्रपट असेल जो मी दिग्दर्शित करतोय. जिओ स्टुडिओ, ज्योती देशपांडेंसोबत ही माझी पहिलीच फिल्म आहे. निखिल साने सर फँड्री पासून सोबत आहेतच. हा प्रवास नक्कीच रंजक आणि संस्मरणीय असेल…! चांगभलं !’
पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर आपण चित्रपट बनवणार असल्याची घोषणा नागराज मंजुळे यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच केली होती. महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात वसलेल्या उमळवाडमध्ये कुस्ती स्पर्धेचे जंगी नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी नागराज मंजुळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याच कार्यक्रमात त्यांनी ‘खाशाबा’ चित्रपटाची घोषणा केली होती. पैलवान खाशाबा दादासाहेब जाधव यांनी २३ जुलै १९५२ रोजी कांस्यपदक जिंकले आणि कॅनडा, मेक्सिको आणि जर्मनीच्या कुस्तीपटूंना पराभूत करत स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक पदक विजेते बनले. भारताला पहिलं ऑलम्पिक मेडल मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा झेंडा फडकावला होता. मात्र १४ ऑगस्ट १९८४ रोजी एका अपघातात त्यांचे दुःखद निधन झाले. या महान कुस्तीपटूच्या बायोपिकबाबत कुस्तीप्रेमी अन प्रेक्षकवर्गात मोठी उत्सुकता आहे.
Discussion about this post