हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकेतून संत परंपरा प्रेक्षकांच्या माहितीत आली. या मालिकेतून प्रेक्षकांनीही भक्तिरसाचा एक विलक्षण आनंद अनुभवला आहे. संत ज्ञानेश्वर माऊलीआणि त्यांची भावंडं, त्यांचं खडतर आयुष्य, रेड्यामुखी वेद, सार्थ श्री ज्ञानेश्वरी, भक्तीरसात तल्लीन भक्त, पसायदान हे सारं काही प्रेक्षकांना भावलं. हरिभक्तीच्या या अलौकिक प्रवासा आता आणखी एक विशेष वळण येणार आहे. या मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवताना आता यात संत सेना महाराज यांचे दर्शन होणार आहे. विशेष म्हणजे या भूमिकेत गायक नंदेश उमप आपल्याला पहायला मिळणार आहेत.
‘ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकेतून संत जीवनाचे विविध अध्याय आपण पाहिले. या प्रवासाची सुरुवात संत कान्होपात्रा यांच्या कथेपासून झाली आणि पुढे संत चोखामेळा यांची कथासुद्धा आपण पाहीली. संत नामदेवांचेही अलौकिक दर्शन घडताना आता या मालिकेत संत सेना महाराज यांचा प्रवेश होतो आहे.
संत सेना महाराज यांची भूमिका गायक नंदेश उमप साकारणार असून त्यांच्या पेहरावाची आणि पहिल्या लूकची प्रेक्षकांमध्ये तुफान चर्चा सुरु आहे. नुकताच त्यांचा या भूमिकेतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.
नंदेश उमप यांनी त्यांच्या या आध्यात्मिक भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली आहे. बोलण्याची पद्धत, शब्दातला ठेहराव, भक्तिरसात बुडालेलं मन अशी दैवी भूमिका साकारताना नंदेश उमप यांच्या खांद्यावर विशेष जबाबदारी आहे. संत सेना महाराज आणि संत ज्ञानेश्वर, त्यांची भावंडं यांची भेट कशी होणार..? हे पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर झाले आहेत.
संत सेना महाराज हे न्हावी समाजाचे प्रमुख. ते आळंदीजवळून प्रवास करत असल्याचे समजताच माऊली आणि त्यांची भावंडं त्यांना भेटण्यासाठी जातात. या भेटीसाठीची त्यांची उत्सुकता फार आहे. पण हि भेट कशी असणार.? हे येत्या पुढील भागांतच कळेल.
Discussion about this post