हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड क्षेत्रात आपले भक्कम स्थान निर्माण करण्यासाठी झगडावे लागते. मेहनत करावी लागते. रात्रीचा दिवस करावा लागतो आणि हेच अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याने केलं आहे. एकेकाळी कोण नवाज विचारणारे आज त्याचे नाव मोठ्या मानाने घेतात. याचे कारणही तसेच आहे.. अनेक नॅशनल इंटरनॅशनल पुरस्कार जिंकून इंडस्ट्रीला सातासमुद्रापार सन्मानित करणाऱ्या कलाकारांपैकी एक नवाज आहे. याहीवेळी नवाजने दुसऱ्यांदा कान्स फेस्टिवल गाजवला आहे. त्याला दुसऱ्यांदा २०२२ मध्ये चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल इंटरनॅशनल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दोन वेळा एमी पुरस्कार जिंकलेले अमेरिकन अभिनेते आणि निर्माता व्हिन्सेंट डी पॉल यांच्या हस्ते नवाजला हा पुरस्कार देण्यात आला. नवाजला असा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ नसून याआधीसुद्धा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नवाजने पुरस्कार पटकावला होता. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती होती. यामध्ये नवाज तुर्की अभिनेता कॅन्सल एलचिन, ‘सेक्स इन द सिटी’ स्टार गिल्स मारिनी, निकोल मुडगे, निगेल डेली आणि जारोसॉ मार्जेव्स्की यांसारख्या परदेशी सेलिब्रिटींसोबत बहुतेक वेळ दिसला.
नवाजुद्दीन सिद्दीकी हे नाव बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील अत्यंत मानाचे नाव आहे. कारण आज हे नाणं एकदम खणखणीत वाजत असलं तरी इतकं वाजण्यासाठी त्याने फार मेहनत घेतली आहे हे सारेच जाणतात. अलीकडेच नवाज टायगर श्रॉफसोबत ‘हिरोपंती २’ या चित्रपटात शेवटचा दिसला होता. यानंतर आता लवकरच तो कंगना रनौत निर्मित ‘टिकू वेड्स शेरू’, ‘नूरानी चेहरा’ आणि ‘अदभूत’ या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. याआधी नवाजने किक, बजरंगी भाईजान यासारखे चित्रपट गाजवले आहेत.
Discussion about this post