हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कॉमिक शोच्या माध्यामातून घराघरांत पोहचत प्रेक्षकांच्या मनामनांत ठाण मांडून बसलेला कुशल बद्रिके एक बहुआयामी कलाकार आहे. उत्तम अभिनेता तर तो आहेच. पण सोशल मीडियावरील त्याच्या पोस्ट पाहिल्या तर त्याच्या लेखणीची धार तुमच्या लक्षात येईल. कुशलचे सोशल मीडियावर बरेच फॉलोवर्स आहेत आणि याच चाहत्यांनी त्याच्यामधल्या लेखकाची प्रतिभा जाणली आहे. सध्या कुशलने समुद्रकिनारी निवांतपणा अनुभवताना शेअर केलेल्या काही ओळी चाहत्यांसाठी लक्षवेधी ठरल्या आहेत.
कुशलने फेसाळलेल्या समुद्रासमोर निवांत बसलेला फोटो शेअर करत लिहिले आहे कि, ‘समुद्रातून उसळून आलेल्या प्रत्येक लाटेला, परतणारी एक लाट अडवते. मग ऐकू येते समुद्राची गाज, फेसाळत्या किनाऱ्याचा आवाज, अविरत…… कधीही न संपणारं… रात्रभर भावनांचा असाच एक समुद्र कधीकधी मनात थैमान घालत रहातो, ज्याच्या किनाऱ्या वरून कुणी साधं फिरकत सुद्धा नाही. :- सुकून’ कुशलची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कुशलच्या लेखनाला त्याचे चाहते उदंड प्रतिसाद देत आहेत.
आतापर्यंत कुशलने अनेकदा विविध आशयाच्या, विविध विषयांवर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. या प्रत्येक पोस्टमध्ये कुशलने मांडलेला विषय असो किंवा भावना या थेट नेटकऱ्यांपर्यंत पोहचत असल्याने अनेकदा आपण पाहिले आहे. याहीवेळी कुशलच्या लेखणीने नेटकऱ्यांच मन जिंकलंय. कुशलच्या या पोस्टवर कमेंट करताना एकाने लिहिले आहे कि, ‘समुद्रावर फिरकताना सुद्धा समुद्रा एवढ्या अती विचारात गुंतलेल्या मनाची व्यथा मोडत आलेल्या डावाची सांगून समुद्रास ही कथा निरोप घ्यावा असा की समुद्रास ही वाटले पाहिजे आकाश ही कमी पडेल समजून घेण्यास मज आता :- एक आधार’
Discussion about this post