हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज रामनवमीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असताना दिग्दर्शक ओम राऊत याने आपला आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’चे नवेकोरे पोस्टर रिलीज केले आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटाबाबत असणारी उत्सुकता रोज नव्याने वाढत असताना आता या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्यामध्ये प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमंतरायाचं दर्शन होत आहे. आज रामनवमीचे औचित्य साधून हे पोस्टर शेअर केले असून काही नेटकऱ्यांनी याला पसंती दर्शवली आहे. तर काही नेटकरी पुन्हा नाराज झाले आहेत.
‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा टिझर काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता. यामध्ये वापरलेले VFX आणि रावणाचे पात्र पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. चित्रपट येण्याआधीत वादाला तोंड फुटले. मात्र ओम राऊतने प्रेक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे बदल करू अशी ग्वाही दिली आणि यामुळे प्रकरण थंड पडलं होतं. अशातच आता रिलीज झालेले हे नवे पोस्टर पाहून कसूभरही सुधारणा झालेली नाही असे म्हणत नेटकऱ्यांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली आहे. तरीही सोशल मीडियावर हे पोस्ट तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
या पोस्टरमध्ये श्री रामाच्या भूमिकेतील अभिनेता प्रभास, तर माता सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री क्रिती सॅनॉन, लक्ष्मणाच्या भूमिकेत अभिनेता सनी सिंग आणि हनुमंताच्या भूमिकेत अभिनेता देवदत्त नागे दिसत आहे. हे पोस्टर शेयर करताना ओम राऊतने एक खास कॅप्शनही दिले आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले आहे कि, ‘मंत्रों से बढ़के तेरा नाम.. जय श्री राम’. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट येत्या १६ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल होताना पाहून प्रेक्षक वर्ग आनंदी होईल अशी अपेक्षा होती. मात्र नेटकऱ्यांनी धरलेला नाराजीचा सूर पाहता चित्रपटाचे भविष्य अजूनही धोक्यात आहे असंच दिसतंय.
Discussion about this post