हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्वराज्याच्या तिन्ही छत्रपतींचे छत्र हरवल्यानंतर पोरक्या झालेल्या मराठा साम्राज्याला आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून आपल्या कर्तुत्वाने आधार देणाऱ्या रणमर्दिनी, रणरागिनी महाराणी ताराबाई राजाराम भोसले म्हणजे स्त्रीनेतृत्वाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण होय. ज्यांच्या शौर्याचे गुणगान मुघलांसारख्या बलाढ्य शत्रुनेदेखील केले, ज्यांची राजनीति आणि रणनीती इतिहासकारांनी गौरविली, बिकट आणि क्लिष्ट परिस्थितीतही ज्यांनी उत्तम व्यवस्थापनाचे उदाहरण स्थापित केले यासोबत एक पुत्री, सून, पत्नी, माता तसेच राजस्त्री या भूमिकांमध्ये देखील आदर्श प्रस्थापित केले अशा अष्टपैलू स्त्रीचे जीवनचरित्र सर्वांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी’ या ग्रंथावर आधारित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत.
नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. यात असामान्य शौर्य दाखवणाऱ्या, रणांगण गाजवणाऱ्या, आक्रमक राजकारणी छत्रपती ताराराणी यांची झलक दिसत आहे. मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचे हे विलक्षण पर्व आहे जिथे एक युगप्रवर्तक सासऱ्याचे, पराक्रमी पित्याचे, कुशल राजकारणी अशा पतीचे आणि शूर, गुरुसमान दिराचे छत्र हरवलेली तडफदार स्त्री औरंगजेबासारख्या बलाढय शत्रूविरुद्ध त्यांचे नेतृत्व करत आहे. दिग्दर्शक राहुल जाधव म्हणाले कि, ‘चित्रपट हे समाजप्रबोधनाचे आणि समाजजागरणाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. सध्याच्या आणि येणाऱ्या पिढ्यांवर चांगला प्रभाव पाडणारे, उत्कृष्ट वैयक्तिक आणि सामाजिक मूल्यांची स्थापना करणारे चित्रपट निर्माण होणे ही काळाची गरज आहे म्हणूनच प्रत्येक पिढीतील स्त्रियांना आदर्श वाटावे असे व्यक्तिमत्त्व पडद्यावर आणण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटाद्वारे करत आहोत.’
छत्रपती ताराराणींची भूमिका साकारण्याचा मान मिळाल्याबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणते, ‘छत्रपती ताराराणी. मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धातील एक रणरागिणी. त्यांचे कार्य, कर्तृत्व दैदिप्यमान आहे. अशा तडफदार व्यक्तिमत्वाची भूमिका साकारायला मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे.’ प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘जगाच्या इतिहासात महाराणी ताराबाई यांच्या कर्तृत्वाला तोड नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने एका महान स्त्रीची कहाणी घराघरांत पोहोचणार आहे. आजवर छत्रपती महाराणी ताराबाई भोसले यांची शौर्यगाथा फार अशी प्रकाशझोतात आलेली नाही. या निमित्ताने त्यांचे कर्तृत्व जगासमोर येईल.’
Discussion about this post